
पालिकेकडून कोरोना रोखण्यासाठी केल्या जाणाऱया प्रयत्नांमुळे मुंबईत रुग्णसंख्या आटोक्यात आली असून प्रतिबंधित क्षेत्रात झपाटय़ाने घट होत आहे. यामध्ये गेल्या 11 दिवसांत तब्बल 1596 ठिकाणांची प्रतिबंधांच्या कचाटय़ातून सुटका झाली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत मुंबईत 4168 सील इमारती आणि चाळी-झोपडपट्टय़ांमध्ये 365 कंटेनमेंट झोन शिल्लक राहिले आहेत.
कोरोनाची लागण थांबवण्यासाठी रुग्ण आढळलेले चाळी-झोपडपट्टय़ांचे भांग, इमारतीचा भाग-मजला पालिकेच्या माध्यमातून पंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येत आहे. यामध्ये एकाच इमारतीत दहापेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारतच सील करण्यात येत आहे. मुंबईत रुग्णवाढ मोठय़ा प्रमाणात होत असताना या प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या दहा हजारांपार गेली होती. मात्र पालिकेच्या माध्यमातून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत घरोघरी तपासणी, सर्वेक्षण, मार्गदर्शन आणि प्रभावी कार्यवाही केल्यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रात दररोज शेकडोंची घट होत आहे. दिवाळी सुरू झालेल्या वसुबारस दिवशी म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी मुंबईत 5636 सील इमारती व 493 पंटेनमेंट झोन होते. ही संख्या कमी होऊन 22 नोव्हेंबर या दिवशी दोन्ही प्रकारची प्रतिबंधित क्षेत्रांची एकूण संख्या 1596 इतकी कमी झाली आहे.
आतापर्यंत 50 हजार इमारतींची सुटका
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर पालिकेच्या माध्यमातून इमारती, इमारतीचा भाग सील करण्याच्या धोरणामुळे आतापर्यंत 49 हजार 888 इमारती सील करून पुन्हा प्रतिबंधमुक्त करण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत आता 4168 सील इमारती राहिल्या आहेत. दरम्यान, सील इमारती प्रतिबंधमुक्त करण्यात येत असल्या तरी मुंबईकरांनी कोरोना रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेऊन पालिकेच्या लढय़ाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
दुपटीच्या कालावधीत मात्र चढउतार!
मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या कमी होत असताना रुग्ण दुपटीच्या कालावधीत मात्र चढउतार होत असल्याचे समोर आले आहे. 12 नोव्हेंबर रोजी 240 दिवस असणारा रुग्णवाढीचा कालावधी वाढत जाऊन 18 नोव्हेंबर रोजी 320 दिवसांवर गेला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या वतीने धारावीत
28 तारखेपर्यंत अँटीजेन आणि आरटीपीसीआर चाचण्या होणार आहेत. कुभारवाडा येथील पालिकेच्या आरोग्य केंद्रात रहिवाशांची तपासणी करण्यात आली.
मात्र गेल्या काही दिवसांत वाढणाऱया रुग्णसंख्येमुळे मुंबईतील सरासरी रुग्णवाढीचा कालावधी पुन्हा 258 दिवसांवर आला आहे. मुंबईत दिवाळीत वाढलेल्या गाठी-भेटींमुळे आणि चाचण्यांची संख्या वाढवल्यामुळे रुग्णसंख्या काही प्रमाणात वाढत असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.



























































