मुंबईत कोरोनाचे 1197 नवे रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत गेल्या एकाच दिवसात 1197 नवीन कोरोनाबाधित आढळले असून 61 प्रलंबित रिपोर्टसह 136 जणांचा मृत्यू झाल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबईत गेल्या एकाच दिवसांत 610 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे एकूण कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या 32 हजार 867 झाली आहे.

मुंबईत आज नोंदवण्यात आलेल्या 136 मृत्यूंमध्ये 75 मृत्यू 16 ते 19 जून या कालवधीतील असून 61 मृत्यू 16 जूनपूर्वीचे असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या मृतांमध्ये 94 पुरुष आणि 42 महिलांचा समावेश आहे. यातील 76 जणांचे वय 60 वर्षांहून अधिक होते. तर 9 जणांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी तर 51 रुग्ण 40 ते 60 वर्षे वयोगटातील होते. मृतांमधील 92 रुग्णांना दीर्घकालीन आजारही होते. मुंबईत सध्या 28 हजार 839 ऑक्टिव्ह केसेस असल्याची माहितीही पालिकच्या आरोग्य खात्याकडून देण्यात आली.

फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई व महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस हलाखीची होत आहे. 19 जून रोजी महाराष्ट्रात आतापर्यंतचे सर्वाधिक 3, 827 रुग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईत सर्वाधिक बळींची संख्या 114 इतकी नोंदवली आहे. 18 जूनपर्यंतच्या आकडेवारीचा विचार केला, तर राज्यातील एकूण कोरोना रुग्णांच्या संख्येत 52.18 टक्के वाटा एकटय़ा मुंबईचा आहे. मुंबई व एमएमआर क्षेत्राचा विचार केला, तर हा वाटा 73.85 टक्के इतका आहे. मुंबईचा मृत्यूदर हा 5.27 टक्क्यांवर पोहोचला आहे, अशी चिंता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.