
मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणाऱया कोस्टल रोडचे काम सध्या वेगाने सुरू असून बांधकामात सागरी जीव आणि जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी सागरी भिंतीच्या बाजूने तब्बल आठ टनांपर्यंतच्या दगडांनी तब्बल 6.47 किमीचा नैसर्गिक दगडी सेतू तयार करण्यात येत आहे. यामुळे सागरी प्रवाळ वाढण्यास मदत होणार असून सागरी जिवांना आश्रयही मिळणार आहे. वरळी किनारी अशा प्रकारे सागरी प्रवाळ वाढण्यास सुरुवातही झाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील पालिकेच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱया सागरी मार्गाच्या कामामध्ये पर्यावरण रक्षणाची विशेष काळजी घेतली जात आहे. प्रिन्सेस स्ट्रिट फ्लायओव्हर ते वरळी सी लिंक या 10.58 किमी लांबीच्या बांधकामात बांधाव्या लागणाऱया ‘सी ऑल’चा आराखडा नैसर्गिक प्रकारे करण्यात आला असून बायोडायव्हर्सिटी जपण्यासाठी 2 ते 8 टनांचे दगड कुंडेलवाल, सिडको, एअरपोर्ट नवी मुंबई या ठिकाणाहून आणण्यात येत आहेत. या कामासाठी एकूण 12 लाख टन दगड वापरले जात आहेत. दरम्यान, कोरोना काळातही कोस्टल रोडचे काम वेगाने सुरू असून जुलै 2023 पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती सागरी किनारा रस्त्याचे प्रमुख अभियंता विजय निघोट यांनी दिली.
‘राणीच्या हारा’चे वैभव अबाधित!
- कोस्टल रोडच्या कामात मुंबईचे वैभव असणाऱया ‘राणीच्या हारा’ला कोणताही धक्का लागणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. यासाठी रस्त्याच्या बांधकामात 2.072 किमीचे दोन महाकाय बोगदे खोदण्यात येत आहेत. राणीचा हाराच्या ठिकाणाच्या खालून कोस्टल रोड जाणार आहे.
- कोस्टल रोडच्या बांधकामात तब्बल 60 हेक्टर ‘ग्रीन स्पेस’ मिळणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोकळय़ा जागेचा आनंद घेता येणार आहे. कोस्टल रोडमुळे रहदारीच्या वेळी मरीन ड्राइव्ह ते वरळी सी लिंकपर्यंतचा एक तासाचा प्रवास केवळ दहा मिनिटांत होणार आहे.

































































