कोस्टल रोडच्या कामासाठी सर्वात मोठी टनेल मशीन आज मुंबई बंदरात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोस्टल रोडच्या कामासाठी चीनमधून आणली जाणारी देशातील सर्वात मोठी टनेल मशीन आज 20 एप्रिल रोजी सागरी मार्गाने मुंबई बंदरात डेरेदाखल होत आहे. प्रिंन्सेस स्ट्रिट ते वरळी सी-लिंकपर्यंतच्या 9.98 किमीच्या मार्गात असणाऱया एकूण 3.45 किमीचा बोगदा खोदण्यासाठी या मशीनचा वापर होणार आहे. यामुळे कोस्टलचे काम आणखी वेगवान होणार असून 2022 अखेरची डेडलाईन पाळणार असल्याचा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन असला तरी अत्यावश्यक सेवेतील रस्त्याच्या कामासाठी शेकडो कामगार कित्येक दिवस घरी न जाता अहोरात्र कामासाठी राबत आहेत. त्यामुळे कोस्टल रोडचे 9 टक्के काम पूर्ण झाले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील आणि मुंबईला वेगवान बनवणाऱया 13 हजार कोटींच्या ‘कोस्टल रोड’चे काम 13 ऑक्टोबर 2018 रोजी सुरू करण्यात आले. मात्र या प्रकल्पामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत असल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्यामुळे 16 जुलैला 2019 रोजी कोस्टल रोडला स्थगिती देण्यात आली. मात्र पालिकेने सर्वोच्च न्यायालयात कोस्टल रोडबाबत यशस्वीरीत्या बाजू मांडली. यामुळे मुंबईत वाढलेली वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड महत्त्वपूर्ण आणि आवश्यक असल्याचे सांगत 17 डिसेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने कोस्टल रोडच्या कामावरील स्थगिती उठवली. त्यामुळे बंद असलेले काम तातडीने सुरू करण्यात आले. 18 डिसेंबरपासून सुरू असलेल्या कामामध्ये आतापर्यंत 9 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, सहा महिन्यांच्या स्थगितीमुळे ऑक्टोबर 2022 ची प्रकल्पाची डेडलाइन काही महिने लांबण्याची शक्यता असल्यामुळे किमान डिसेंबर 2022 पर्यंत काम पूर्ण करण्यासाठी पालिका अत्याधुनिक यंत्रसामग्री वापरत आहे. यासाठी चीनमधून आणल्या जाणाया टनेल मशीनसह अत्याधुनिक यंत्रसामग्री वापरली जात आहे. सद्यस्थितीत समुद्राच्या बाजूने बांधण्यात येणाऱया भिंतीसासाठी आवश्यक असणारे चार टनांपर्यंत वजन असणारे आर्मर स्टोन बसवणे, स्ट्रोम वॉटर ड्रेनेज,ऑल अकॅनखा अँकरिंग आदी पावसाळापूर्व कामे वेगात सुरू आहेत.

मुंबईला वेगवान बनवणार कोस्टल रोड
– कोस्टल रोडमुळे प्रिंन्सेस स्ट्रिट या मुंबईच्या दक्षिण टोकापासून थेट वांद्रय़ापर्यंत मुंबईकरांना टोल- फ्री जाता येणार आहे.
– शिवाय मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार असून वेळ आणि इंधनाची बचत होणार असल्याने मुंबईच्या विकासालाही चालना मिळणार आहे.
– कोस्टल रोडमुळे वेळेची बचत 70 टक्के होईल, तर प्रतिवर्षी इंधनाची बचत 34 टक्के होईल. शिवाय ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.

70 ट्रक जोड पार्ट, बावीसशे टन वजन, 80 मीटर लांब
या अवाढाव्य टनेल मशीनचे वजन तब्बल 2200 टन आहे. या मशीनचे पार्ट 70 ट्रक भरतील इतके आहेत. 28 मार्चपासून सागरी मार्गाने चीन मधून प्रवास सुरू झाला आहे. आता ही मशीन 20 एप्रिल रोजी मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे दाखल होणार असल्याचे कोस्टल रोडचे प्रमुख अभियंता विजय निघोट यांनी सांगितले. यानंतर काही दिवसांतच ही मशीन प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी दाखल होणार आहे. प्रिंन्सेस स्ट्रिट ते वरळी सी-लिंकपर्यंतच्या 9.98 किमीच्या मार्गात असणाऱया गिरगाव ते प्रियदर्शनी पार्कपर्यंतचा एकूण 3.45 किमीचा बोगदा खोदण्यासाठी या मशीनचा वापर होणार आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर सुरक्षितता पाळून काम
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोस्टल रोडचे काम करताना कामगारांची संपूर्ण काळजी घेतली जात आहे. सध्या 600 तील 50 टक्के म्हणजेच 300 कामगारांच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. सर्व कामगारांची कोरोना चाचणी 8 आणि 9 मार्च रोजी करण्यात आली आहे. शिवाय दररोज कामावर येण्यापूर्वी दैनंदिन तपासणी केल्यानंतरच काम सुरू करण्यात येत आहे. शिवाय सुरक्षित अंतर, मास्कचा वापर, निर्जंतुकीकरण केले जात असल्याची माहिती कोस्टल रोडचे प्रमुख अभियंता विजय निघोट यांनी दिली. शिवाय 150 कर्मचारी कोस्टल रोड येथेच राहतात. त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था त्याच ठिकाणी करण्यात आली आहे.