
सामना प्रतिनिधी। मुंबई
मुंबईच्या समुद्रालगत बांधण्यात येणाऱया महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडसाठी मेट्रो रेल्वेच्या कामासाठी आणलेल्या टनेल बोअरिंग मशीन्सपेक्षाही (टीबीएम) लांब मशीन्स आणल्या जाणार आहेत. लार्सन ऍण्ड टुब्रो कंपनीकडे हे काम सोपविण्यात आले आहे. सध्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-3 मार्गासाठी भुयारीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी 17 मशीन्स कार्यरत आहेत. त्या 94 मीटर लांबीच्या आहेत.
कोस्टल रोडसाठी आणण्यात येणारी मशीन 100 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद आहे. कोस्टल रोडसाठी भुयारी मार्ग उभारला जाणार आहे. या भुयारीकरणासाठी हे मशीन भूगर्भात उतरवावे लागणार असून त्यासाठी खड्डा खणण्याचे काम सुरू आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत हे टीबीएम मशीन मुंबईत येईल आणि भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात होईल, अशी माहिती कोस्टल रोड प्रकल्पाचे मुख्य अभियंता मोहन माचीवाल यांनी दिली. प्रिन्सेस स्ट्रीट ते प्रियदर्शिनी पार्कदरम्यान दोन भुयारी मार्ग बनविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

































































