
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (टी-20 स्पर्धा) स्पर्धा नुकतीच हिंदुस्थानात पार पडली. आता बीसीसीआय आगामी दिवसांत विजय हजारे ट्रॉफीचे आयोजन करणार आहे. येत्या 18 फेब्रुवारीपासून ही स्पर्धा खेळवण्यात येण्याची दाट शक्यता आहे. मात्र अद्यापही मुंबई संघ प्रशिक्षकाविनाच आहे. ही खेदजनक बाब. विजय हजारे ट्रॉफीसाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. यामधून मुंबईचा अंतिम संघ निवडला जाणार आहे.
कसा निवडला जाणार संघ
विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबईचा संघ कसा निवडला जाईल, याबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सूत्रांकडून माहिती देण्यात आली की, कॅम्पसाठी 104 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या खेळाडूंकडून दोन ते तीन दिवस सराव करवून घेतला जाईल. त्यानंतर निवडलेल्या खेळाडूंची तीन संघांमध्ये विभागणी केली जाईल. तीन दिवस लढती रंगतील. यामध्ये चांगली कामगिरी करणाऱया क्रिकेटपटूंना विजय हजारे ट्रॉफीसाठी निवडण्यात येईल.
104 खेळाडूंची निवड कशाला?
विजय हजारे ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येणाऱया कॅम्पसाठी मुंबईच्या 104 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात इतक्या खेळाडूंना एकाच ठिकाणी बोलावणे कितपत योग्य ठरील. तसेच या मोसमात आता सीनियर संघासाठी फक्त एकच स्पर्धा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी इतक्या मोठय़ा प्रमाणात खेळाडूंची निवड करणे कितपत योग्य, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
समन्वय कसा साधणार?
क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. यामध्ये यश मिळवण्यासाठी कोच व खेळाडू यांच्यामध्ये योग्य समन्वय साधला जाणे गरजेचे आहे. पण मुंबईचा संघ अद्याप प्रशिक्षकाविनाच आहे. त्यामुळे सय्यद मुश्ताक अली स्पर्धेप्रमाणेच आगामी विजय हजारे ट्रॉफीत मुंबईची दैना उडू शकते. विजय हजारे ट्रॉफीचे आयोजन 18 फेब्रुवारीपासून करण्यात आल्यास मुंबईच्या खेळाडूंना क्वारंटाइनचा कालावधी धरून पुरेसा सराव करता येईल का, हाही प्रश्न यावेळी निर्माण झाला आहे.

























































