मुंबई क्रिकेटचा पाय खोलात, पदाधिकाऱयांचा प्रशिक्षक निवडीत हस्तक्षेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानातील दादा संघ म्हणून ओळखल्या जाणाऱया मुंबई क्रिकेट संघाचा पाय सध्या खोलात गेला आहे. कोरोनामुळे उशिरा सुरू झालेल्या यंदाच्या मोसमातील पहिल्याच स्पर्धेत मुंबईवर साखळी फेरीतच गारद होण्याची नामुष्की ओढवली. त्यानंतर प्रशिक्षक अमित पागनीस यांनी तडकाफडकी आपले पद सोडून दिले. आता आगामी स्पर्धांसाठी नव्या प्रशिक्षक निवडीलाही विलंब होत असून या निवडीमध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) पदाधिकारी क्रिकेट सुधारणा समितीवर दबाव टाकत आहेत, अशी माहिती एमसीएच्या सूत्रांनी यावेळी दिली. एपूणच काय तर अंतर्गत अडचणींमुळे मुंबई क्रिकेट संघाचाच पाय खोलात गेला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

अमोल मुजुमदार की रमेश पोवार

क्रिकेट सुधारणा समितीकडून मुंबईच्या प्रशिक्षकपदासाठी रमेश पोवारला पसंती देण्यात आली आहे. पण एमसीए पदाधिकाऱयांनी याच पदासाठी अमोल मुजुमदारचे नाव क्रिकेट सुधारणा समितीला सुचवले आहे, मात्र प्रत्यक्षात याबाबतची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंबई संघाचे नुकसान होत आहे.