
रेल्वे, बेस्ट बस व गर्दीच्या ठिकाणी लोकांचे मोबाईल चोरून ते मोबाईल स्वस्तात विकणाऱ्या एका गुन्हेगाराला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-6ने अटक केली. त्यांच्याकडून चोरीचे चार मोबाईल हस्तगत केले असून कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल दोन गुह्यांची उकल झाली आहे.
लोकांचे चोरलेले मोबाईल विकण्यासाठी एक जण चेंबूरच्या गोल्फ क्लबजवळ येणार असल्याची माहिती युनिट-6ला मिळाली. त्यानुसार प्रभारी निरीक्षक भरत घोणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि चिकणे, उपनिरीक्षक संदीप रहाणे, बेळणेकर, माशेरे व पथकाने गोल्फ क्लब येथे सापळा लावून मिळालेल्या माहितीच्या आधारे एका संशयिताला उचलले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ सीम कार्ड नसलेले चार मोबाईल मिळून आले. तसेच एक हातोडी आणि काही सामान मिळून आले. त्याची पोलिसांनी चौकशी केली असता त्याने ते मोबाईल लोकमान्य टिळक टर्मिनस बुकिंग परिसरातून चोरी केल्याचे सांगितले. सूरज निहुरा सिंग (25) असे त्या आरोपीचे नाव असून तो मूळचा यूपीच्या गोरखपूरचा रहिवाशी आहे.