Mumbai crime news – लोकलमधील क्षुल्लक वादातून शिक्षकाला प्लॅटफॉर्मवरच संपवलं; आरोपी सीसीटीव्हीत कैद

मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील गजबजलेल्या मालाड रेल्वे स्थानकात शनिवारी सायंकाळी लोकलमधील क्षुल्लक वादातून शिक्षकाची हत्या करण्यात आली. आलोक सिंह (वय – 31) असे हत्या झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. आरोपीने धारदार शस्त्र भोसकून त्यांना ठार मारले आणि तिथून पळ काढला. आरोपी पळून जाताना रेल्वे स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या व्हिडीओच्या आधारे रेल्वे पोलिसांनी ओंकार शिंदे (वय – 27) याला ताब्यात घेतले आहे. त्याची सध्या कसून चौकशी सुरू आहे.

शनिवारी सायंकाळी आरोपी ओंकार आणि आकोल सिंह हे एकाच लोकलमधून प्रवास करत होते. यावेळी लोकलमधून उरतण्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. मालाड स्थानक येताच दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि रागाच्या भरात ओंकारने आलोक यांना धारधार शस्त्राने भोसकले. यानंतर ओंकारने तिथून पळ काढला. तर या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आलोक यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या हत्याकांडामुळे एकच खळबळ उडाली आणि आरोपीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले. पोलिसांनी वेगाने हालचाली करत प्लॅटफॉर्म आणि पादचारी पुलांवर लावलेले सीसीटीव्ही तपासले. यात आरोपी पळून जाताना दिसला. त्या आधारे पोलिसांनी रविवारी सकाळी ओंकार शिंदे याला बेड्या ठोकल्या. त्याचे कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याचे समोर आले असून सध्या पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.

दरम्यान, आलोक सिंह हे विलेपार्लेतील नरसी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये गणिताचे प्राध्यापक होते. 2024 पासून ते या कॉलेजमध्ये कार्यरत होते. त्यांचे वडील संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या सुरक्षेमध्ये तैनात होते. अनेक वर्ष त्यांनी राजनाथ सिंह यांचे सुरक्षारक्षक म्हणून काम केले.