
राज्यातील ‘लाडक्या बहिणी’ सुरक्षित नसल्याचे मुंबईत घडलेल्या धक्कादायक घटनेतून उघडकीस आले आहे. फोर्ट येथून घाटकोपरच्या घरी निघालेल्या वैमानिक महिलेचा धावत्या पॅबमध्ये दोघा नराधमांनी विनयभंग आणि जबरदस्तीचा प्रयत्न केला. यादरम्यान पोलिसांची नाकाबंदी पाहून आरोपींनी पळ काढला. दरम्यान, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
तक्रारदार महिलेचा पती हिंदुस्थानी नौदलात सेवेत आहे. त्याला भेटायला सायंकाळी फोर्ट परिसरात आली होती. पतीसोबत रात्री एकत्र जेवण केल्यानंतर तिने फोर्ट येथून घाटकोपरला जाण्यासाठी कॅब बुक केली. काही अंतर पुढे गेल्यानंतर कॅबचालकाने घाटकोपरला जाण्याचा मार्ग बदलला आणि गाडी दुसरीकडे थांबवली. त्यावेळी दोघेजण कॅबमध्ये घुसले. त्यांनी कॅबमध्ये बसलेल्या महिलेशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. तिने आरडाओरड करू नये म्हणून तिला गप्प बसण्यास सांगतानाच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. काही अंतर गेल्यावर चालकाला नाकाबंदी दिसली. त्याने गाडीचा वेग कमी करताच दोघे कॅबमधून उतरून पळून गेले.
नराधमांपाठोपाठ चालकही पळाला
कॅबमध्ये घुसलेल्या दोघा नराधमांनी पोलिसांची नाकाबंदी पाहून पळ काढला. यादरम्यान घाबरलेल्या महिलेने कॅबचालकाला विचारणा केली. मात्र पोलिसांच्या तावडीत सापडण्याच्या भीतीने तोदेखील काही न सांगता पळून गेला. तिथून कशीबशी सुटका मिळवत महिलेने स्वतःचे घर गाठले आणि घडलेल्या संपूर्ण प्रकाराची माहिती पतीला सांगितली. त्यानंतर पतीने घाटकोपर पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. संबधित कंपनीच्या टॅक्सीचालकाची माहिती काढण्याचे काम पोलीस करत आहेत. तपासासाठी पोलिसांचे पथक तयार केले आहे.