ओरिसाहून विक्रीसाठी आणलेला गांजा जप्त, पाचजणांना अटक; एक देशी बनावटीचे पिस्तूल व काडतुसे हस्तगत

मालवणी पोलिसांनी गांजा तस्करांविरोधात धडक कारवाई केली. पोलिसांनी पाचजणांना पकडून तब्बल 204 किलो 60 ग्रॅम गांजा तसेच एक देशी बनावटीचे पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त केली. ड्रग्ज तस्करांनी जप्त केलेला गांजा ओरिसाहून विक्रीसाठी आणला होता.

मिळालेल्या माहितीच्या आधारे मालवणी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक डॉ. दीपक हिंडे यांना वासीफ हुसेन आशिक हुसेन खान याने त्याच्या ताब्यात गांजाचा साठा करून ठेवला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वासीफला पकडून त्याच्याकडे असलेला एक किलो 60 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला होता. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता नाशिक येथील संतोष मोरे याचे नाव समोर आले. मग पोलिसांनी तीन दिवस कसून शोध घेत संतोष याला अटक केली. संतोष याने पोलिसांना चौकशीत सांगितले की, चौघे मढ मालवणी येथे असून त्यांच्याकडे गांजाचा साठा आहे. त्यानुसार पोलिसांनी मढ येथून दोन गाडय़ांमध्ये असलेल्या चौघांना ताब्यात घेतले. जप्त केलेल्या दोन गाडय़ांमध्ये 203 किलो चार ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. या प्रकरणात पोलिसांनी एकूण 204 किलो 60 ग्रॅम गांजा, दोन गाडय़ा, एक पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.