
संपूर्ण देशात कोरोनाच्या छायेत नवरात्रीचा उत्सव साजरा केला जात आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. म्हणून या काळात गरबा, दांडिया व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत अशा सूचना राज्याच्या गृह विभागाने जारी केल्या आहेत. अशातच रविवारी महाविद्यालयात गरबा नाईटचे आयोजन केल्या प्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नेहमीप्रमाणे गस्तीवर असताना त्यांना एसएनडीटी महाविद्यालयाजवळ अनेक कार पार्क असल्याचे दिसले. यानंतर पोलीस महाविद्यालयाच्या आत नेमके काय सुरू आहे, हे पाहण्यासाठी आत गेले असता त्यांना महाविद्यालयाच्या हॉलमध्ये गरबा पार्टी सुरू असल्याचे आढळले. यावेळी 100 हून अधिक लोक कोविड नियमांचे उल्लंघन करत नाचताना पोलिसांना दिसले.
यावेळी पोलिसांनी तातडीने कारवाई करत ही पार्टी तिथेच थांबवली. पोलिसांनी या गरबा नाईटच्या आयोजकाला आणि हॉल मालकासह तिघांना अटक केली. मात्र नंतर त्यांना सोडण्यात आलं. तसेच या गरबा नाईटमध्ये सहभागी झालेल्या 100 हुन अधिक लोकांना पोलिसांनी ताकीद देऊन सोडून दिले.





























































