
रक्षाबंधनाच्या दिवशी ठिकठिकाणी सोनसाखळी चोरून शहरातील वातावरण गरम करणाऱया तसेच पुन्हा चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या दोघा सराईत सोनसाखळी चोरांचा मोठय़ा शिताफीने तपास करत पंतनगर पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त केला. सीसीटीव्हीच्या आधारे कधी पे अॅण्ड पार्क तर कधी केएफसीचे कर्मचारी बनून पोलिसांनी सराईत दोघा स्नॅचरच्या मुसक्या आवळल्या.
या प्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुहास कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमित यादव, राहुल वाघमारे व पथकाने तत्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळापासून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तेव्हा साकीनाका येथील एका पे अॅण्ड पार्कपर्यंत त्या चोरांचा ठावठिकाणा लागला. पाच ठिकाणी स्नॅचिंग केल्यानंतर चोरांनी त्याच पे अॅण्ड पार्पमध्ये दुचाकी पार्क केली होती. त्यामुळे पोलिस पे अॅण्ड पार्कवाले बनले आणि चोरटे तेथे कधी येतात त्याची वाट पाहू लागले. पण तसे करूनही काही म्हणावा तसा फायदा झाला नाही. त्यामुळे वाघमारे व यादव यांनी त्या परिसरातील आणखी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पे अॅण्ड पार्पपासून काही अंतरावर दुसरी दुचाकी चोरांनी पार्प केल्याचे आढळून आले. तपासानंतर हैदर अली सारंग हा सदरची दुचाकी वापर असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी त्याला उचलले.
अंधेरीच्या केएफसीमध्ये वेशांतर करून सापळा
हैदर अली हाती लागल्यानंतर त्याने साथीदार हुसेन हाकम याच्याबरोबर पाच ठिकाणी स्नॅचिग केल्याचे कबूल केले. त्यानंतर मग त्याच्याकरवी पायधुनी येथे राहणाऱया हुसेनशी संपर्प साधून त्याला केएफसी येथे बोलावले. मग पोलिसांनी आधीच जाऊन केएफसीचे कर्मचारी बनून सापळा लावला. ठरल्याप्रमाणे हुसेन तेथे येताच पोलिसांनी त्याचीसुद्धा गठडी वळली.
दोन ठिकाणी पचका झाला
हैदर अली आणि हुसेन यांनी सोनसाखळी चोरण्यासाठी दोन पल्सर 220 गाडय़ा चोरल्या होत्या. त्याच दुचाकीवरून त्यांनी एकाच दिवशी पाच ठिकाणी स्नॅचिंग केल्या. त्यापैकी पंतनगर, विनोबा भावे नगर आणि विलेपार्ले येथील गुह्यांची उकल झाली, पण अन्य दोन ठिकाणी आरोपींनी स्नॅचिंग केली त्याबाबत तक्रारच दाखल झाली नव्हती. कारण त्या दोन्ही ठिकाणी चोरलेले दागिने बनावट होते. त्यामुळे ते दागिने फेकून दिल्याची कबुली आरोपींनी दिली. अशा प्रकारे सात गुह्यांची उकल करण्यात पंतनगर पोलिसांना यश आले.


























































