
मुंबईचे मॅनेजमेंट गुरु म्हणून बिरुद मिळविणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांचा आता असंघटित कामगार म्हणून समावेश करण्यात आला आहे. मुंबईत जे पात्र डबेवाले आहेत, त्यांचा यात समावेश करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारतर्फे जाहीर करण्यात आले आहे. या निर्णयामुळे मुंबईतील डबेवाल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
भारतीय विकास संस्थेचे योगेश दुबे यांनी यासंदर्भात राज्य मानवाधिकार आयोगाकडे एक प्रकरण सादर केले होते. या प्रकरणात निर्णय देताना वरील निर्णय घेण्यात आला असल्याचे कळते. त्यानुसार आता मुंबईतील पात्र डबेवाल्यांना असंघटित कामगारांमध्ये समावेश करण्यात येणार आहे. असंघटित कामगारांसाठी मंडळ गठीत करण्यात आले आहे. या मंडळांमध्ये पात्र ठरणाऱ्या डबेवाल्यांना मंडळांचा योजनांचा लाभ मिळविता येणार आहे. ज्यात प्रामुख्याने केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, या योजनेचे लाभ मिळू शकणार आहे. या निर्णयामुळे मुंबईतील डबेवाल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयाचे मुंबई डबेवाले असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी स्वागत केले आहे. जर सरकारने काही आर्थिक मदतीची घोषणा केली तर त्याचाही लाभ मिळू शकतो. हा निर्णय म्हणजे मुंबईच्या डबेवाल्यांसाठी ही मोठी उपलब्धी आहे. ही उपलब्धी डॉ.योगेश दुबे यांनी मिळवून दिली त्या बद्दल मुंबई डबेवाला असोशिएशन त्यांचे आभारी असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.




























































