
दरवर्षी शाळेच्या परीक्षा संपल्या की अनेक मुलांना वेध लागतात ते उन्हाळी शिबिरांचे. सुट्टीत लोक गावाला, शहराबाहेर जाण्यापूर्वी एप्रिलच्या मध्यावर छंदवर्ग आयोजित करण्याकडे कल असतो. मात्र गेल्या वर्षी आणि या वर्षीही लॉकडाऊनमुळे प्रत्यक्ष शिबीर घेणे शक्य झालेले नाही. त्यामुळे ऑनलाईन उन्हाळी शिबिरे घेतली जात आहेत. त्यांच्या माध्यमातून घरातूनच मुले सुट्टीची धम्माल अनुभवत आहेत. अशा शिबिरांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
चित्रकला, नृत्य, क्रिकेट, गायन, नाटय़कला त्यासोबतच व्यक्तिमत्त्व विकास, गिर्यारोहण, जंगल भ्रमंती, ट्रेकिंग, स्वीमिंग अशा अनेक शिबिरांचे दरवर्षी कुठे ना कुठे आयोजन होत असते. यंदा या ऑफलाईन शिबिरांना ब्रेक लागलाय. मात्र मुलांच्या मनोरंजनाला, छंदाला ब्रेक लागू नये म्हणून ऑनलाईन पर्याय निवडण्यात आला आहे. मुलांनी लॉकडाऊनमध्ये टीव्ही, इंटरनेट, व्हिडियो गेमवर वेळ घालवण्यापेक्षा वेगवेगळ्या छंदामध्ये मन रमवावे, यासाठी पालक वर्गाकडून ऑनलाईन शिबिरांची चौकशी होताना दिसत आहे. मुंबई मराठी साहित्य संघात बालनाटय़ शिबिरांबाबत विचारणा करणारे असे अनेक कॉल येत आहेत. सध्या साहित्य संघातर्फे 16 वर्षांहून अधिकच्या वयोगटांसाठी ऑनलाईन नाटय़प्रशिक्षण शिबिरे सुरू झाली आहेत.
दादर संस्कार वर्ग
मागील चार वर्षांपासून सीमा उपाध्ये आणि स्वाती चितळे या दादर संस्कार वर्ग हा उपक्रम चालवत आहेत. एप्रिल महिन्यात या संस्कार शिबिराला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी येत्या 13 ते 22 मे दरम्यान संस्कार वर्ग होणार आहेत. यात श्लोक पाठांतर व उपासना, संस्कृत संभाषण, बौद्धिक व पारंपरिक खेळ, चित्रकला-हस्तकाwशल्य, रांगोळी, पाककला, योग, खेळ विज्ञानाचे, गोष्टींचा तास यांचा समावेश आहे. शैक्षणिक, सामान्य ज्ञान यांच्या जोडीला श्लोकही शिकवतो, अशी माहिती स्वाती चितळे यांनी दिली.
ऊर्जा आणि आनंद
अभिनेते सुदीप मोडक मागील सहा-सात वर्षांपासून मुलांना नाटय़प्रशिक्षण देत आहेत. कोरोनाच्या संकटामुळे सध्या त्यांची ऑनलाईन नाटय़शिबिरं सुरू आहेत. सोमवार आणि गुरुवारी सायंकाळी 6.30 ते 8 या वेळेत झूम अॅपवर हे नाटय़वर्ग भरतात. सध्या कोरोनासारख्या कठीण काळात मुलांनी ऑनलाईन माध्यमातून का होईना, एकमेकांना भेटले पाहिजे, बोललं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे. यासाठी नाटक हे खूप चांगले माध्यम आहे. मुलांमध्ये ऊर्जा, सकारात्मकता वाढवण्याचे काम तसेच मुलांचे काwन्सिलिंगचे काम अशा नाटय़शिबिरांतून होते, असे सुदीप मोडक यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना सांगितले.
नऊ दिवसांचा नवलोत्सव
‘आपलं गंमतघर’तर्फे नऊ दिवसांचा नव्या नवलाईचा धमाल नवलोत्सव आयोजित करण्यात आला आहे. येत्या 9 ते 17 मे दरम्यान 10 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांचा हा नवलोत्सव ऑनलाईन साजरा होईल. यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांची माहिती, मनोरंजन, चक्रावून टाकणाऱया विज्ञान गप्पा, पपेट शो, चित्रकलेच्या विविध शैली आणि माध्यमांची अनोखी प्रात्यक्षिके, विदेशातील बालकथा, समजून घ्या बँक कशी काम करते, आपण आपला क्यूआर कोड कसा बनवावा, एकपात्री धमाल विनोदी कार्यक्रमाची मजा अनुभवता येईल.

























































