धारावीत स्क्रिनिंग, जनजागृतीवर भर; क्वारंटाइन मोडणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल

धारावीसह दादर, माहीममध्ये कोरोना नियंत्रणात असला तरी धारावीसारख्या संवेदनशील विभागात क्रिनिंग आणि जनजागृतीवर भर देण्यात आला आहे. मात्र, त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करण्याविरोधातही पालिकेने कठोर कारवाई करायला सुरुवात केली असून आतापर्यंत क्वारंटाईनचे नियम मोडणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 5 मंगल कार्यालयांना प्रत्येक 10 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

मुंबईतील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आशियातील सर्वात मोठय़ा झोपडपट्टीतील कोरोना नियंत्रणात असला तरी पालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी सुरू असून त्या जोडीला भीती पसरू नये यासाठी जनजागृतीवर भर देण्यात आला आहे. आता ज्या ठिकाणी रुग्ण सापडत आहेत, अशा ठिकाणी मोबाईल व्हॅन पाठवून आरोग्य तपासणी केली जात आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी चारपेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत अशा ठिकाणी आरोग्य शिबिरे भरवली जात आहेत. त्याचबरोबर दरदिवशी माईकवरून गल्ल्यागल्ल्यांमध्ये जाऊन मोठय़ा प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.

संस्थात्मक विलगीकरणावर भर  

धारावी ही झोपड्डय़ांनी, दाटीवाटीने वसलेली वस्ती आहे. एकाच घरात अनेक जण दाटीवाटीने राहतात. इथे सुरक्षित अंतर ठेवणे आणि घरीच क्वारंटाईन करणे शक्य होत नाही. त्यामुळे संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्यात आला आहे. धारावीबरोबरच दादर येथील वनिता समाज येथील कोरोना केंद्रात रुग्णाला उपचारांसाठी दाखल करण्यात येत आहे. पालिकेच्या पाच दवाखान्यांमध्ये अँटीजेन आणि आरटी-पीसीआर चाचण्या दरदिवशी केल्या जात आहेत. त्यामुळे धारावीत कोरोना नियंत्रणात आहे, अशी माहिती जी-उत्तर विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ. विरेंद्र मोहिते यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या