
बँकेत खाते काढायचे असो, गॅसची सबसिडी मिळवायची असो की अन्य सरकारी कार्यालयात काही काम असो सर्वत्र ओळखपत्राचा पुरावा म्हणून आधारकार्ड जोडणे बंधनकारक आहे. मात्र आजही अनेक नागरिकांकडे आधारकार्ड नाही. त्यामुळे त्यांची मोठी गौरसोय होत आहे. त्याची दखल घेत शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना विभागप्रमुख, आमदार सुनील प्रभू यांनी दिंडोशी विधानसभा क्षेत्रात आजपासून आधारकार्ड कॅम्प सुरू केला असून त्याचे उद्घाटन प्रभू यांच्या हस्ते झाले.
दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील सर्व शाखांमध्ये प्रत्येकी तीन दिवस कॅम्प होणार असून शिवसेना शाखा क्र. 43 पासून आज सुरुवात झाली आहे. कोरोनासंबंधित सर्व नियमांचे पालन करून आयोजित केलेल्या आजच्या कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिंडोशी विधानसभा क्षेत्रात आजपासून 30 मार्चपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना शाखा क्र 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 44 या शाखांमध्येही अनुक्रमे कॅम्प होणार असून कुरारमधील ओम कुराराबाद बिल्डिंग साईबाबा मंदिरजवळ, तानाजी नगर येथील आमदार सुनील प्रभू यांच्या जनसंपर्क कार्यालयातही कॅम्पचे आयोजन होणार आहे.
दरम्यान, नवीन आधारकार्ड काढण्यासाठी नागरिकांनी बँक पासबुक, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशनकार्ड, लाईट बिल, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड या आवश्यक कागदपत्रांच्या मूळ प्रतीसह दोन छायांकित प्रती घेऊन यावे, असे आवाहन आमदार सुनील प्रभू यांनी केले आहे.



























































