धोकादायक ठिकाणांवरील लोकांना सुरक्षितस्थळी हलवा, आपत्ती प्रतिबंधक उपायांचा आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई आणि मुंबई उपनगर जिह्यात काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे आणि दरड कोसळल्याने जीवितहानी झाली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी संरक्षक भिंती असूनही दुर्घटना घडल्या अशा आणि इतर धोकादायक ठिकाणी आयआयटीच्या तज्ञांच्या मदतीने अभ्यास करून विविध पर्याय सादर करा. त्याचबरोबर धोकादायक ठिकाणांवरील लोकांना सुरक्षितस्थळी हलवा, अशा सूचना मुंबई उपनगर जिह्याचे पालकमंत्री आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केल्या.

आदित्य ठाकरे यांनी आज वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मुंबई उपनगर जिह्यातील धोकादायक ठिकाणांचा आढावा घेतला. पावसामुळे दरड कोसळलेल्या मुंबई उपनगरातील ठिकाणांचा मागील आठवडय़ात प्रत्यक्ष पाहणी दौरा केला होता. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही बैठक आयोजित करून अशा दुर्घटना पुन्हा घडू नये म्हणून कायमस्वरूपी उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा केली. लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासह महापालिका, एमएमआरडीए, वन विभाग, म्हाडा इत्यादी विभागांनी समन्वयाने काम करावे आणि वस्त्या असलेल्या सुरक्षित ठिकाणांना प्राधान्य द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, निवासी उपजिल्हाधिकारी विकास नाईक आदी उपस्थित होते.

मृतांच्या वारसांना दीड कोटीची मदत

वाशी नाका-चेंबूर, विक्रोळी, भांडुप येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना दीड कोटींची मदत राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळाला भेट देऊन मृतांच्या वारसांना सरकारच्या वतीने त्वरित मदत देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्य आपत्ती मदतनिधी व मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृतांच्या वारसांना पाच दिवसांमध्ये मदतीचे वाटप केले.

सीएसआर, बिगर शासकीय संस्थांच्या समन्वयाने लसीकरण गतिमान करावे

मुंबईत लसीकरणाचे काम उत्तम रितीने सुरू आहे. मात्र, संभाव्य तिसऱया लाटेची शक्यता लक्षात घेऊन सीएसआर निधी आणि बिगर शासकीय संस्थांच्या समन्वयातून लसीकरणाची गती आणखी वाढवावी, अशी सूचना पर्यावरण आणि मुंबई उपनगर जिह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. पालिकेच्या अधिकाऱयांसह आज आदित्य ठाकरे यांनी लसीकरणासह शहरातील विविध कामांचा आढावा घेतला. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याबाबत विविध उपाययोजनांवर चर्चा केली. नागरिकांकडून त्यांच्या भागातील खड्डय़ांबाबत आलेल्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन ते बुजवण्यात यावेत, असेही निर्देशही त्यांनी दिले. बैठकीदरम्यान शहरात पूरस्थिती हाताळण्यासाठी अमलात आणलेल्या उपाययोजनांचाही त्यांनी आढावा घेतला. यावेळी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, पी. वेलरासू, सुरेश काकाणी, डॉ. संजीव कुमार, सहआयुक्त चंद्रशेखर चोरे, उपायुक्त राजन तळकर, अजय राठोर आदी उपस्थित होते.