मुंबई जिल्हा उपनगर हाऊसिंग फेडरेशन निवडणुकीत शिवसेनेचा भगवा

मुंबई जिल्हा उपनगर को-ऑप. हाऊसिंग फेडरेशन लिमिटेड सहकारी संस्थेच्या पदाधिकारीपदाच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा भगवा झेंडा फडकला आहे. फेडरेशनच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे अभिषेक विनोद घोसाळकर, सचिवपदी रमेश प्रभू तर खजिनदारपदी संजय वामन भोसले यांची निवड करण्यात आली. मुंबई जिल्हा उपनगर को-ऑप. हाऊसिंग फेडरेशनच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी सुनील पी. राणा यांच्या उपस्थितीत ही निवडणूक संपन्न झाली. विजयानंतर शिवसैनिकांनी फटाके पह्डत आणि गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला.

मुंबईतील पूर्व व पश्चिम उपनगरातील सुमारे 4 हजार 235 गृहनिर्माण संस्था या फेडरेशनच्या अधिपत्याखाली कार्यरत आहेत. दरम्यान नवनिर्वाचित अध्यक्ष अभिषेक घोसाळकर यांनी सर्व सभासदांचे आभार मानत फेडरेशनच्या माध्यमातून गृहनिर्माण संस्थेच्या समस्या सोडवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला, तर गृहनिर्माण संस्था तक्रार निवार समिती वार्डनिहाय स्थापन करून तक्रार निवारणाचे काम केले जाईल व गृहनिर्माण संस्था सभासदांच्या थकबाकीदार वसुलीसाठी स्वतंत्र अधिकारी नेमणूक करून लिगल सेलची स्थापना करणार असून वसुली दाखला उपनिबंधकाकडून मिळवून त्याबद्दलची अंमलबजावणी केली जाईल, असे उपनगर जिल्हा फेडरेशनचे सचिव रमेश प्रभू यांनी सांगितले. यावेळी मुंबई जिल्हा उपनगर फेडरेशनचे सर्व संचालक, पांडुरंग देसाई, संदीप जाधव, जितेन परमार, स्मिता चौधरी, अॅड. सुनीता गोडबोले, विशाल कांबळे, उषा भोर, नंदकुमार वरणकर आदी उपस्थित होते.