
सामना प्रतिनिधी। मुंबई
रेल्वे रुळांलगत पिकवल्या जाणाऱया भाजीपाल्यासाठी गटारातले दूषित पाणी वापरले जाणार नाही याची काळजी घ्या, जेणेकरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल आणि यापुढे जर असे आढळून आले तर संबंधित ठेकेदारांचे परवानेच रद्द करू, अशी सक्त ताकीद मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी रेल्वे व्यवस्थापकांना दिली.
मुंबईतच नव्हे तर संपूर्ण देशात रेल्वे रुळांलगत असलेल्या अतिरिक्त भूखंडांवर पारंपरिक शेती केली जाते. मुळा, पालक, लाल माठ, भेंडी आदी पिकांचे उत्पादन या शेतीद्वारे घेतले जाते. ‘ग्रो मोअर फूडस्’ या संकल्पनेअंतर्गत रेल्वे प्रशासनाने निविदा काढून हे ठेके रेल्वेच्याच तृतीय आणि चतुर्थ श्रेणी वर्गातील कर्मचाऱयांना दिले आहेत; परंतु या पिकांसाठी स्वच्छ पाणी न वापरता गटारातले सांडपाणी वापरले जात असल्यामुळे ऍड. जगन्नाथ खरगे यांच्या ‘माझा भारत’ सामाजिक संस्थेमार्फत हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.
न्यायमूर्तींनी याचिकेची दखल घेत रेल्वे प्रशासनाला जाब विचारला. मध्य व पश्चिम रेल्वे व्यवस्थापकांना दूषित पाणी वापरले जाणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिले व याचिका निकाली काढली.
याचिकाकर्त्यांचे म्हणणे
याचिकाकर्त्यांनी कोर्टाला सांगितले की, या भाज्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली असता त्यामध्ये झिंक, लोह, आर्सेनिक आणि तांब्याचे प्रमाण जास्त आढळून आले आहे. या भाज्यांच्या सेवनाने मानवी आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच अशा पिकांच्या उत्पादनावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
रेल्वेचे म्हणणे
रेल्वेच्या वतीने बाजू मांडणाऱया ऍड. सुरेश कुमार यांनी कोर्टाला सांगितले की, प्रशासनाने कर्मचाऱयांना भाजीपाला उत्पादनाचे परवाने दिले असले तरी दूषित पाणी वापरण्याबाबत कोणतीही परवानगी दिलेली नाही.

































































