
मुंबईत गेल्या वर्षी 11 एप्रिलला सुरू झालेली नालेसफाई यावर्षी एक महिना आधीच सुरू झाली असून 27 कामांसाठी कार्यादेश देण्यात आले आहेत. या वर्षी साडेदहा लाख मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 31 मेपर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करण्यात येत आहे.
मुंबईत छोटे नाले, मोठे नाले आणि रस्त्यालगतच्या जलवाहिन्या, पाणी निचरा होण्याची ठिकाणे यामध्ये येणारी माती, घाण, कचरा, गाळामुळे अनेक वेळा भरल्याचे प्रकार घडतात. छोटे नाले व रस्त्यालगतच्या पर्जन्य जलवाहिन्यांमधून सांडपाणी आणि काही प्रमाणात गाळ वाहून नेला जातो. मात्र छोटय़ा नाल्यांचा काही भाग भरती-ओहोटी भागात येत असल्यामुळे पाण्याचा निचरा न होता गाळ साचून राहतो. त्यामुळे अतिवृष्टीत या नाल्यांमधील पाणी शहरात घुसण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून पावसाळ्याआधी नालेसफाईचे काम हाती घेण्यात येते. गेल्या वर्षी ही नालेसफाई 11 एप्रिल रोजी सुरू झाली होती. मात्र या वर्षी एप्रिलमध्येच नालेसफाई सुरू करण्यात आली आहे.
असे होणार काम
मोठय़ा नाल्यातून जवळपास 4 लाख 63 हजार मेट्रिक टन तसेच छोटे नाले व पावसाळी गटारे यातून 4 लाख 24 हजार मेट्रिक टन एवढा गाळ काढला जातो. यानुसार एकूण सुमारे साडेदहा लाख मेट्रिक टन गाळ काढून मुंबईबाहेर डंपिंग ग्राऊंडवर टाकला जाणार आहे. यापैकी साडेसात लाख मेट्रीक टन गाळ पावसाळ्यापूर्वी 31 मेपर्यंत काढण्यात येणार आहे.
नालेसफाईच्या कामात 31 मेपर्यंत पहिला टप्पा संपणार आहे. या टप्प्यात एकूण गाळापैकी 80 टक्के गाळ काढला जाईल. दुसरा टप्पा पावसाळ्यातील कामाचा असून यामध्ये 10 टक्के नालेसफाई केली जाणार आहे. हा कालावधी 1 जून ते 30 सप्टेंबर असा राहणार आहे. तर तिसऱया टप्प्यात पावसाळ्यानंतर 10 टक्के काम केले जाणार आहे.
या वर्षी 226 कोटींचा खर्च
यावर्षी नालेसफाईसाठी पालिका प्रशासनाने अर्थसंकल्पात 226 कोटींची तरतूद केली आहे. छोटे नाले, मोठे नाले, रस्त्याच्या कडेची पावसाळी गटारे व मिठी नदी यामधील गाळ काढण्याच्या एकूण 31 कामांसाठी यावेळी निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यापैकी 27 कामे लवकरच सुरू होणार आहेत. मोठय़ा नाल्यांसाठी 90 कोटी, छोटय़ा नाल्यांसाठी 90 कोटी आणि मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी 46 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.





















































