
सामना प्रतिनिधी । मुंबई
आठवडाभरापासून सुरू असलेल्या रिपरिप पावसामुळे हवामानात गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून सुसाट सुटलेल्या मुंबापुरीतील एसी, पंखे, कुलरचा वेग मंदावला असून विजेच्या मागणीत तब्बल 1200 मेगावॅटची घट झाली आहे.
उन्हाळ्यात तापमानाच्या पार्याने चाळिशी गाठल्याने आणि वाढलेल्या उकाड्यामुळे मुंबापुरीत एसी, पंखे आणि कुलरचा वापर वाढला होता. त्यामुळे विजेच्या मागणीत साडेतीन हजार मेगावॅटपर्यंत वाढ झाली होती. मात्र मान्सूनपूर्व पावसाच्या सरी गेल्या आठ-दहा दिवसांपासून बरसत असल्याने तापमानाचा पारा 30 अंशापर्यंत खाली आला आहे. तसेच उकाडाही कमी झाला आहे. त्यामुळे कार्यालयांबरोबरच घरातील बरेचसे एसी आणि कुलरचा वापर कमी झाल्याने विजेची मागणी कमालीची कमी झाली आहे. एरवी उन्हाळ्यात साडेतीन हजार मेगावॅटच्या घरात असलेली विजेची मागणी आज 2350 मेगावॅटपर्यंत खाली आली आहे. त्यासाठी टाटा पॉवरने 870 मेगावॅट, अदानी इलेक्ट्रीसिटीच्या डाहाणू येथील प्रकल्पातून 374 तर पॉवर एक्सचेंजमधून 1110 मेगावॅट वीज घेतली आहे.
राज्याची मागणीही घसरली
तापमानात झालेली घट आणि ठिकठिकाणी पाऊस पडू लागल्याने राज्यातही विजेची मागणी घटली आहे. एरवी 18 हजार मेगावॅटच्या घरात असलेली विजेची मागणी साडेपंधरा हजार मेगावॅटपर्यंत झाली आहे. त्यामुळे महानिर्मितीबरोबरच खासगी वीज प्रकल्पांवरील भार कमी झाला आहे.
विजेची मागणी कमी
आज महानिर्मितीने सवासहा हजार मेगावॅट, खासगी प्रकल्पातून सहा हजार मेगावॅट तर केंद्रीय एक्सचेंजमधून चार हजार 300 मेगावॅट एवढी वीज घेतली आहे.




























































