
पंढरपूर येथे भरणाऱया कार्तिकी एकादशी यात्रेसाठी (8 नोव्हेंबर) एसटी महामंडळाने राज्यातील विविध बस स्थानकांवरून सुमारे 1300 जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. दि. 6 ते 12 नोव्हेंबर या कालावधीमध्ये ही जादा वाहतूक करण्यात येणार आहे. याशिवाय आवश्यकतेनुसार जादा बसेस सोडण्याचे निर्देश स्थानिक एसटी प्रशासनाला महामंडळाकडून देण्यात आलेले आहेत.
पंढरपूर यात्रेनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱया संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांची सोय करण्याच्या हेतूने दरवर्षीप्रमाणे एसटीने यंदादेखील 1300 जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. या यात्रेला विशेषतः कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे या विभागातून भाविक प्रवाशांची जास्त गर्दी होते. यास्तव या 5 विभागांतून मुंबई -110, रायगड -100, सिंधुदुर्ग -30, ठाणे -30, रत्नागिरी -120 विशेष जादा बसेस सोडण्यात येत आहेत. पंढरपूर येथे स्थानिक बस स्थानकांबरोबरच चंद्रभागा नगर येथे विभागनिहाय तात्पुरत्या बस स्थानकाची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविक प्रवाशांनी या सोयीचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.




























































