
सामना प्रतिनिधी। मुंबई
‘हिमालय’ पूल दुर्घटनेनंतर रेल्वेने सर्वच धोकादायक बांधकामांचा फेरआढावा घेण्यास प्रारंभ केला असताना आता पश्चिम रेल्वेच्या वांद्रे येथील कलानगर उड्डाणपुलाची पादचारी मार्गिका पाडण्यासंदर्भात पश्चिम रेल्वेने नोटीस जारी केली आहे. हा पूल पीडब्ल्यूडी बांधणार आहे. या मार्गिकेवरील सर्व प्रकारच्या युटिलिटी केबल्स संबंधित यंत्रणांनी सात दिवसांत हटवाव्यात अन्यथा रेल्वे जबाबदार राहणार नाही, असे या नोटिसीत नमूद करण्यात आले आहे.
3 जुलै 2018 रोजी अंधेरीच्या गोखले पुलाची पादचारी मार्गिका कोसळून पाच ठार झाले होते. त्यानंतर कलानगर पुलासह अन्य पुलांवरील अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, वांद्रे -कलानगर उड्डाणपुलाची पादचारी मार्गिका गोखले पुलाप्रमाणेच कँटिलिवर पद्धतीची असल्याने आणि तिच्यावरही केबल, टेलिफोन आणि अन्य युटिलिटीच्या केबल्सचा भार असल्याने ती कमजोर झाली असल्याने तिला हटविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
धारावी पुलाच्याही केबल्स हटविणार
माहीम आणि वांद्रे दरम्यानच्या धारावी दरम्यानच्या धारावी उड्डाणपुलावरील युटिलिटी केबल्सही हटविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून सात दिवसांत या केबल्स हटवण्यात याव्यात अन्यथा त्या तोडण्यात येतील, असे जाहीर आवाहन पश्चिम रेल्वेने केले आहे.



























































