
रुईया नाक्याचा गणपती हा रुईया नाक्याचा विद्यार्थ्यांचा राजा अशा नावाने आपल्याला परिचित आहे. 1978 मध्ये या गणपतीची स्थापना रुईया कॉलेजमध्ये झाली होती. पण हा गणेशोत्सव अधिक भव्य पद्धतीने साजरा केला जावा व महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये या उद्देशाने हा विद्यार्थ्यांचा राजा असलेला गणपती रुईया नाक्यावर विराजमान झाला. यावर्षीच्या गणेशोत्सवात त्यांनी ‘फ्री डंब’ अशी संकल्पना घेतली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे झाली. पण देशाला स्वातंत्र्य मिळूनही आपण अजून वेगवेगळ्या समस्यांच्या पारतंत्र्यात आहोत हे सांगण्यासाठी पिंजऱयातून उडालेले कबूतर हे पुन्हा जात-पात, धर्मभेद, भ्रष्टाचार अशा प्रकारच्या पारतंत्र्यात अडकले आहे, असे भाष्य येथे करण्यात आले आहे. या वर्षीच्या मूर्तीसमोरील देखाव्यातून ‘बुरा मत देखो, बुरा मत सुनो आणि बुरा मत बोलो’ ही संकल्पना वेगळ्या प्रकारे मांडली आहे.
गणपतीची मूर्ती ही मूर्तिकार सुनील वराडकर यांनी साकारली आहे. माजी विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव रुईयाचे आजी विद्यार्थी सर्व दहा दिवस आनंदाने साजरा करतात.
पर्यावरणस्नेही गणेशोत्सव

भारत एज्युकेशन सोसायटीचे संत गाडगे महाराज वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालय हे महाविद्यालय खेतवाडी बाराव्या गल्लीत आहे. या कॉलेजमध्ये गणपतीची स्थापना दरवर्षी केली जाते. यंदा या गणपती उत्सवाचे 88 वे वर्ष आहे. सरदार हायस्कूलमधील विद्यार्थी आणि संत गाडगे महाराज कॉलेजचे विद्यार्थी यांनी मोठय़ा उत्साहाने गणपतीच्या मखराची सजावट केली. येथील गणपती हा पाच दिवसांचा असून उत्सवाच्या निमित्ताने कॉलेज तर्फे वत्तृत्व स्पर्धा, पोस्टर मेकिंग स्पर्धा तसेच रांगोळी स्पर्धा, मेहेंदी स्पर्धा आणि टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार करणे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कॉलेजचे माजी विद्यार्थी, कॉलेजमधील सर्व प्राध्यापक वर्ग आणि कॉलेजमधील सध्याचे विद्यार्थी रोज आरतीसाठी व पूजेसाठी एकत्र येतात. गणपतीची मूर्ती गिरगावातील मादुस्कर यांच्याकडील असून ती पर्यावरणस्नेही मूर्ती आहे. लेझीम आणि ढोल पथकाच्या साथीने विसर्जन मिरवणूक निघते.
गणेश आचवल

























































