
मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये लवकरच ‘गारगाई’ या आणखी एका मोठ्या धरणाची भर पडणार आहे. या धरणासाठी जमीन संपादित करण्याच्या प्रस्तावाला शनिवारी सुधार समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यामुळे या धरण प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे. गारगाई प्रकल्पामुळे मुंबईला दररोज होणाऱया 3958 दशलक्ष पाणीपुरवठय़ात प्रतिदिन 440 दशलक्ष लिटर पाण्याची भर पडणार आहे.
मुंबईकरांना मोडकसागर, तानसा, अप्पर कैतरणा, मध्य कैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज 3958 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो, मात्र मुंबईचा झपाटय़ाने होणारा औद्योगिक विकास आणि वाढणारी लोकसंख्या यामुळे पाण्याची मागणीही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या डॉ. एम. ए. चितळे यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ समितीच्या शिफारशींनुसार पालिकेने मध्य वैतरणा प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर गारगाई प्रकल्प प्राधान्याने विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे. यामध्ये या प्रकल्पासाठी खासगी जमीन वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेतली जाणार आहे. गारगाई प्रकल्पाच्या कामासाठी पालिकेला महाराष्ट्र शासनाच्या 12/11/2013 च्या निर्णयानुसार परवानगीही मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर धरण प्रकल्पासाठी लागणाऱया जमीन संपादनाच्या प्रस्तावाला आज मंजुरी मिळाल्याचे सुधार समिती अध्यक्ष सदा परब यांनी जाहीर केले.
एकूण तीन नवे धरण प्रकल्प
मुंबईकरांसाठी पालिका गारगाई धरण प्रकल्पाबरोबरच पिंजाळ आणि दमणगंगा असे एकूण तीन नवीन जल प्रकल्प सुरू करणार आहे. या तीन प्रकल्पांतून मुंबईकरांसाठी दररोज एकूण 2891 दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. या प्रकल्पांसाठी जमीन संपादन करण्यासाठी विशेष भूसंपादन कक्ष पालिकेने याआधीच सुरू केला आहे.
असे बांधणार धरण
पालिकेचा नियोजित गारगाई प्रकल्प पालघर जिह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळील गारगाई नदीकर बांधण्यात येणार आहे. यामध्ये 69 मीटर उंचीचे, 972 मीटर लांबीचे धरण बांधण्यात येणार आहे. यात मनोऱयाचे बांधकाम, गारगाई ते मोडक सागर जलाशयाच्या दरम्यानचे अंदाजे 2.0 किमी लांबीच्या बोगद्याचे कामही केले जाणार आहे. गारगाई जलाशयातील पाणी बोगद्याद्वारे मोडक सागर धरणात आणून गुरुत्कीय पद्धतीने मुंबईला पुरवण्यात येणार आहे.
प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनही करणार
गारगाई प्रकल्पामुळे एकूण 840 हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहे. यामध्ये सुमारे 424 हेक्टर खासगी जमीन वाटाघाटींद्वारे थेट खरेदी पद्धतीने अधिग्रहित करण्यात येणार आहे. या कामाचा अंदाजित खर्च 147.79 कोटी आहे. दरम्यान, या प्रकल्पामुळे बाधित होणाऱया 619 कुटुंबांचे पुनर्वसन पालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.



























































