गौतम नवलाखा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

443

एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील संशयित आरोपी गौतम नवलाखा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी फेटाळून लावला. दरम्यान, न्यायालयाने नवलाखा यांना अटकेपासून संरक्षण देण्यास देखील नकार दिल्याने नवलाखा यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगावप्रकरणी नवलाखा यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेले अंतरिम संरक्षण 11 नोव्हेंबर रोजी संपले होते. त्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी पुणे जिल्हा न्यायालयात धाव घेत अर्ज दाखल केला. नवलाखा यांच्या अर्जावर सरकारी आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर त्याबाबतचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला होता. या अर्जावरील निकाल होईपर्यंत त्यांना अटक करू नये, असे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र त्यांचा अर्ज पेâटाळल्यामुळे त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

नवलाखा यांच्या वतीने अॅड. रागिणी आहुजा यांनी बाजू मांडली. अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज करणार असून तोपर्यंत नवलाखा यांना अटकेपासून संरक्षण द्यावे अशी मागणी अॅड. आहुजा यांनी केली होती. यापूर्वी आनंद तेलतुंबडे यांना अशा प्रकारचे संरक्षण देण्यात आले आहे, असे अॅड. आहुजा यांनी सांगितले. त्याला सरकारी वकील विलास पठारे यांनी विरोध केला.

 नवलाखा यांच्यावर सुमारे दीड वर्षापूर्वी माओवादी संघटना सदस्य यांच्याशी संबंध असल्याने गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात पोलिसांना प्रथमदर्शनी सबळ पुरावे मिळाले असून या प्रकरणाचा पुढील तपास होणे गरजेचे आहे. आतापर्यंत त्यांना वेळोवेळी न्यायालयाने अटकपूर्व संरक्षण दिलेले आहे. त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यासाठी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज रद्द करण्यात यावा. त्यानंतर न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळत अटकेपासून संरक्षण देण्यासही नकार दिला.

 याप्रकरणी बचाव पक्ष वकिलांनी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता त्यांना उच्च न्यायालयाने लवकर संरक्षण दिले नाही तर त्यांना कधीही अटक होऊ शकते.

आपली प्रतिक्रिया द्या