
मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ च्या अनुषंगाने उमेदवारी माघार घेण्याच्या मुदतीत म्हणजेच आज, शुक्रवार, दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून मिळून एकूण ४५३ नामनिर्देशन पत्रे माघार घेण्यात आली आहे. तर, १ हजार ७२९ उमेदवार निवडणूक लढविण्यास सज्ज आहेत. उद्या, शनिवार, दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून निवडणूक चिन्ह नेमून दिली जाणार आहेत. तसेच, शनिवार, दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी निवडणूक लढविणा-या उमेदवारांची अंतिम प्रसिद्ध केली जाणार आहे.
माननीय राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी जाहीर केलेल्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ च्या कार्यक्रमानुसार, मंगळवार, दिनांक २३ डिसेंबर २०२५ ते मंगळवार, दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजीपर्यंत एकूण ११ हजार ३९१ नामनिर्देशनपत्रांचे वितरण झाले.
नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याच्या अंतिम दिवसापर्यंत म्हणजेच मंगळवार, दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी एकूण २ हजार ५१६ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले. प्राप्त २ हजार ५१६ नामनिर्देशनपत्रांची बुधवार, दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी छाननी करण्यात आली. १६४ नामनिर्देशन पत्रे छाननीत अवैध ठरली. तर उर्वरित २ हजार १८५ नामनिर्देशन पत्रे वैध ठरली.
नामनिर्देशन अर्थात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज शुक्रवार, दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत होती. या निर्धारित कालावधीत ४५३ नामनिर्देशन पत्रे मागे घेण्यात आली. माघारीअंती स्पष्ट झालेल्या चित्रानुसार, १ हजार ७२९ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.
शनिवार दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून उमेदवारांना निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येणार आहे. चिन्ह वाटप पूर्ण झाल्यानंतर निवडणूक लढविणा-या उमेदवारांची अंतिम यादी शनिवार, दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.






























































