
कोरोनासह स्ट्रेन बदलणाऱया अनेक घातक विषाणूंची चाचणी करणारी ‘जिनोम सिक्वेन्सिंग लॅब’ आजपासून पालिकेच्या आरोग्य सेवेत दाखल झाली आहे. या अत्याधुनिक लॅबमध्ये एकाच वेळी 400 चाचण्या होणार असून फक्त दोन दिवसांत या चाचण्यांचा रिपोर्ट येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या लॅबचे आज लोकार्पण करण्यात आले. या लॅबमुळे स्ट्रेन बदलणाऱया विषाणूंच्या चाचण्यांसाठी दोन महिन्यांचे सद्यस्थितीत लागणारे वेटिंग संपणार आहे. त्यामुळे वेळीच निदान झाल्याने वेगाने उपचार करणे शक्य होणार असून नव्या स्ट्रेनच्या आजारांना प्रतिबंध घालता येणार आहे.
पालिकेच्या आरोग्य सेवेत गेल्या शंभर वर्षांपासून महत्त्वाची भूमिका बजावणाऱया मुंबई सेंट्रल येथील टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई यमुनाबाई लक्ष्मण नायर रुग्णालयाच्या शतकोत्तर आरोग्य सेवा उत्सवाच्या सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनेक उपक्रमांची सुरुवात झाली. यामध्ये ‘जिनोम सिक्वेन्सिंग’ लॅबसह लहान मुलांमध्ये आढळणाऱया ‘स्पायनल मस्क्युलर अॅट्रोफी’ आजारावरील दुर्मिळ आणि महागडय़ा ‘स्पिनराझा औषधोपचार प्रकल्पा’चा शुभारंभही नायर रुग्णालयात करण्यात आला. तसेच डॉ. शिशिर श्रीवास्तव लिखित ‘रेज अगेन्स्ट दी डाइंग ऑफ लाइट’ या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले. अनेकांना दीर्घायुष्य देणाऱया शतायुषी नायर रुग्णालयाच्या सेवेला प्रणाम करून सर्व डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचाऱयांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन करीत शतकोत्तर वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ऑनलाइन पार पडलेल्या या सोहळ्याप्रसंगी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार यामिनी जाधव, उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, आरोग्य समिती अध्यक्षा राजूल पटेल, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, महिला व बाल कल्याण समिती अध्यक्ष राजराजेश्वरी रेडकर, विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, ‘टास्क’ पर्ह्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. सुहास प्रभू, पालिकेचे वैद्यकीय शिक्षण व प्रमुख्य रुग्णालय संचालक आणि नायरचे डीन डॉ. रमेश भारमल आदी मान्यवर उपस्थित होते.
17 रुग्णांची निवड
सदर आजाराने ग्रस्त 17 रुग्णांची निवड आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तज्ञांच्या समितीने केली आहे. या 17 रुग्णांना स्पिनराझा हे औषध देण्यासाठी डायरेक्ट रिलिफ ही संस्था सर्व आर्थिक भार उचलणार आहे. स्पिनराझा औषधाच्या एका डोसची किंमत सुमारे 87 लाख रुपये इतकी असून पहिल्या वर्षी सुमारे 6 कोटी तर, त्यापुढील प्रत्येक वर्षी 3 कोटी 20 लाख रुपये इतका खर्च संपूर्ण आयुष्यभर एका रुग्णाला करावा लागतो. यासाठी डायरेक्ट रिलिफ ही संस्था पालिकेला सहकार्य करतेय.
‘एसएमए’वरील कोटय़वधीचे उपचार मुलांवर मोफत होणार
या आजारावरील औषधोपचार अत्यंत महागडे आहेत. ही बाब लक्षात घेता, अमेरिकेतील क@लिफोर्निया स्थित डायरेक्ट रिलिफ या बिगर शासकीय संस्थेने पालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी रुग्णांवर उपचार करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
अशी आहे ‘जिनोम सिक्वेसिंग लॅब’
- नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग ही पद्धती वापरून विषाणूंचे जनुकीय सूत्र ओळखता येते. त्यामुळे एकाच विषाणूच्या दोन किंवा अधिक प्रजातींमधील नेमका फरक ओळखता येतो. असा फरक ओळखू आल्यानंतर उपचार पद्धतीची नेमकी दिशा स्पष्ट होते.
- पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात जिनोम सिक्वेसिंग संयंत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. अमेरिकेतील इलुम्निया या कंपनीने, अमेरिकेतीलच अल्ब्राईट स्टोनब्रिज ग्रुप (ए. एस. जी. – बोस्टन) या संस्थेच्या माध्यमातून एकूण 6 कोटी 40 लाख रुपये किमतीचे 2 जिनोम सिक्वेसिंग संयंत्र पालिकेला दान स्वरुपात दिले आहे.
- त्यासोबत ए. टी. ई. चंद्रा फाऊंडेशन यांनी देखील सुमारे 4 कोटी रुपयांची मदत या संयंत्रांसाठी आणि त्याद्वारे होणाऱया चाचण्यांसाठी केली आहे. सदर जिनोम सिक्वेसिंग संयंत्राद्वारे एकाचवेळी 384 नमुन्यांची तपासणी होऊन 4 दिवसांच्या आत वैद्यकीय निष्कर्ष प्राप्त होऊ शकतात.
- जिनोम सिक्वेसिंग वैद्यकीय प्रयोगशाळा (लॅब) मध्ये एकाचवेळी मोठय़ा प्रमाणावर वैद्यकीय नमुन्यांची चाचणी करता येणे शक्य होते. सध्याच्या कोविड – 19 विषाणू संसर्ग कालावधीत कोविड विषाणूचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. अशा स्थितीत जिनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करून उपचारांना वेग देणे शक्य होईल.

























































