Accident News- मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; वडील आणि मुलाचा मृत्यू

मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईकडून महाडच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कारने मागून कंटेनरला जोरदार धडक दिली. या अपघातात वडील व मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी महामार्गावरील कोलाड जवळच्या पुई गावाजवळ घडला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर कारमधील एका जखमी व्यक्तीला तात्काळ माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तसेच सुदैवाने कार चालकाला किरकोळ मार लागला असून, त्याला कोलाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान या अपघातग्रस्त कारने कंटेनरला इतक्या जोरात धडकली की, कारमध्ये अडकलेल्या एका व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी हायड्रॉलिक कटरचा वापर करावा लागला. या अपघाताची माहिती मिळताच कोलाड पोलीस आणि एस व्ही आर एस रेस्क्यू टीम तसेच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने मदतकार्य करून जखमींना रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास कोलाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन मोहिते करत आहेत.