कुडाळातही बॉक्सवेलच्या भिंती धोकादायक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणांतर्गत ठिकठिकाणी निकृष्ठ दर्जाचे काम झाले असून त्याचा नमुना कणकवली येथील उड्डाणपुलाच्या बॉक्सवेल भरावाची भिंत कोसळल्यानंतर समोर आला आहे. कुडाळ शहरातील काळपनाका येथील बॉक्सवेल जवळचा भराव खाली बसल्याने या बॉक्सवेलजवळ सिमेंट बॉक्सच्या भिंतीचा काही भाग बसला आहे. तर एका बाजूचा सर्व्हिस रोडही खचत असल्यामुळे बॉक्सवेलच्या भिंतीलाही धोका निर्माण झाला आहे.

महामार्ग चौपदरीकरणांतर्गत ठिकठिकाणी अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत व आमदार वैभव नाईक यांनीही महामार्ग चौपदरीकरणांतर्गत कामाची प्रत्यक्ष पाहणी करीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देत समस्या तातडीने दूर करण्यासह लोकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच काम दर्जेदार करावे अशा आवश्यक सूचना दिल्या आहेत. कुडाळसह वेताळबांबर्डे व पणदूरतिठा येथील बॉक्सवेलच्या भिंतींनाही असाच धोका निर्माण होत असून या ठिकाणच्या सर्व्हिस रोडने ये-जा करणाऱ्यांना जीव सांभाळून जा असे सांगण्याची वेळ आली आहे.