
मुंबई गोवा महामार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाली आहे. देखभाल दुरुस्ती अभावी महामार्गाची अक्षरक्षः दूरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गावर सध्या धुळीचे साम्राज्य असून प्रवाशांना आणि वाहनचालकांना धुळीतूनच प्रवास करावा लागत आहे.
मुंबई गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या 84 किलोमिटरच्या रुंदीकरणाला 2011 मध्ये सुरवात झाली. मात्र 2019 वर्ष सरायला आले तरी महामार्गाच्या कामाला गती मिळालेली नाही. रस्त्याचे काम अपूर्ण असून झालेल्या कामाचा दर्जाही निकृष्ट आहे. पावासामुळे या महामार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाली आहे. पावसाळ्यात खड्डे भरण्यासाठी माती आणि खडीचा वापर करण्यात आला होता.ही खडी आणि माती वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरू लागली आहे. वाहनांच्या रहदारीमुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात धुराळा उडत आहे. हा धुराळ्यामुळे समोरच्या गाड्या दिसणे कठीण झाली आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. तर खडीवरून गाड्या घसरण्याची भीती व्य़क्त होत आहे.
महामार्गाची पळस्पे ते इंदापुर मार्गातील परिस्थिती दयनीय आहे. पळस्पे ते इंदापुर या पट्ट्यातील महामार्गावर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. कोलाड ते इंदापुर, खांब ते कोलाड, सुकेळी खिंड ते वाकण फाटा, गडब ते वडखळ आणि वडखळ ते खोपोली बायपास या पट्ट्यात महामार्गाची चाळण झाली आहे. त्यामुळे 72 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना तीन ते चार तासाचा वेळ लागत आहे. तर खड्डे चुकवत मार्ग काढताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
























































