मुंबई-गोवा महामार्ग आजही धोकादायक ; गेल्या तीन वर्षात 481 जणांचा अपघाती मृत्यू

31

सामना प्रतिनिधी, खेड

मुंबई गोवा महामार्गावर प्रतिदिनी होणाऱ्या जीवघेण्या अपघातांना आळा घालण्यासाठी महामार्ग चौपदरीकरणाचे हाती घेण्यात आले आहे. मात्र गेल्या तीन वर्षात या मार्गावर झालेल्या जीवघेण्या अपघातांमध्ये 481 जणांना आपला जीव गमवावा लागला असल्याचे वास्तव समोर आले असल्याने मुंबई गोवा महामार्ग आजही प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळाच ठरू पहात आहे. महामार्गावर झालेले अपघात आणि मृत्यू पावलेल्या प्रवाशांची माहिती पोलीस प्रशासनाकडून उपलब्ध झाली आहे. अपघातात गंभीर जखमी होऊन कायमस्वरूपी जायबंदी झालेल्यांची संख्याही कमी नाही.

रायगड जिल्ह्यातील पनवेलपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवीपर्यंतचा 609 किलोमीटरचा महामार्ग मराहराष्ट्र राज्याच्या हद्दीत येतो. या मार्गावर अनेक घाट, अवघड वळणे, अरुंद पूल असल्याने हा मार्ग धोकादायक मार्ग म्हणून ओळखला जातो. गेल्या काही वर्षात या मार्गावर झालेल्या जीवघेण्या अपघातांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर कित्येक कायमस्वरूपी जायबंदी झालेले आहेत. या मार्गावरील कशेडी, भोस्ते, परशुराम, कामथे, वेरळ हे घाट धोकादायक मानले जातात. खेड तालुक्यातील जगबुडी नदी पूल चिपळूण तालुक्यातील वाशिष्ठी नाडीपूल तसेच संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री पूल हे ब्रिटिशकालीन पूलही धोकादायक झालेले असल्याने या पुलावरून वाहने हाकतानाही चालक आणि प्रवाश्याना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. 2016 साली जगबुडी पुलावरून खासगी प्रवासी बस कोरड्या नदीपात्रात कोसळून एकाचवेळी 37 प्रवाशांचा बळी गेला होता. महाड येथील सावित्री नदीवरील पूल पावसात मधोमध तुटल्याने अनेक प्रवाश्याना जलसमाधी मिळाली होती.

प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरलेल्या या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे. या मार्गावर होणाऱ्या अपघातांना आळा बसावा, मुंबई गोवा महामार्गाला मृत्यूचा महामार्ग हा लागलेला डाग पुसला जावा हा या मागचा उद्देश आहे. मात्र चौपदरीकरणाचे काम योग्य प्रकारे होत नसल्याने अपघातांचा धोका कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे. चौपदरीकरणाचे काम करणारे ठेकेदार सुरू असलेल्या कामात मनमानी करत असल्याने अपघातांना आमंत्रण मिळत असल्याचा आरोप कोकणी जनतेतून केला जात आहे.

चौपदरीकरणाचे काम करताना काही ठिकाणी रस्त्यावर मातीचे किंवा दगडाचे ढीग रचून ठेवण्यात येतात. काम करतानाची गरज म्हणून पर्यायी मार्ग तयार करण्यात येतो. रस्त्यात निर्माण झालेल्या अश्या तात्पुरत्या अडथळ्यांची चालकांना पूर्वसूचना मिळावी यासाठी सूचना फलक लावणे ठेकेदारांना बंधनकारक आहे मात्र ठेकेदार कंपनी अशा प्रकारची खबरदारी घेत नसल्याने रस्त्यात रचून ठेवलेल्या दगड मातीच्या ढिगाऱ्याला धडकून अपघात होण्याच्या घटना वाढल्या आहेत. उन्ह्याळ्यात नवा रास्ता तयार जाण्यासाठी टाकलेला मातीचा भराव पावसात जुन्या रस्त्यावर वाहून येणार नाही याचीही खबरदारी कंपनीने घेणे गरजेचे आहे मात्र ती खबरदारीही घेतली गेली नसल्याने पावसात भरावयाची माती रस्त्यावर येऊन रास्ता निसरडा झाला आहे. तयार करण्यात आलेली पर्यायी मार्गही दगड मातीचे असल्याने या पर्यायी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पर्यायी रस्त्यावरील चिखल वाहनांच्या विंडस्क्रीन वर उडून अपघात होऊ लागले आहेत.

पोलीस प्रशासनाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार 2017 ते मे 2019 दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर 1 हजार 985 अपघात झाले असून यातील 405 अपघात हे अतिशय भीषण अपघात होते. या अपघातांमध्ये 481 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. 2017 मध्ये 150 प्राणांतिक अपघातांमध्ये 172 जणांचा मृत्यू झाला असतानाच 2018 मध्ये हा आकडा वाढला आहे. 2018 मध्ये 172 अपघातांत 219 जणांचा बळी गेला आहे. 2019 च्या मे महिन्यापर्यंत एकूण 83 अपघात झाले असून या अपघातांमध्ये 90 जण दगावल्याची नोंद झाली आहे. वेगाने व बेदरकारपणे वाहन चालवणे, दारू पिऊन वाहन चालवणे, ओव्हरटेकचा प्रयत्न करणे ही अपघातांची करणे सांगितली जात असली तरी महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपन्या योग्य ती खबरदारी घेत नसल्याने अपघातात बळी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या