खारपाड्याच्या टोलधाडीविरोधात जनआक्रोश आंदोलन भडकणार; 31 मे रोजी महामार्ग दणाणून सोडणार, अधिकाऱ्यांना विचारणार जाब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकणची जीवनवाहिनी असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या १५ वर्षांपासून लटकले आहे. असे असतानाही खारपाडा येथे सुरू करण्यात आलेल्या टोलधाडीविरोधात ‘मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने’ खारपाडा टोल नाक्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. उद्या शुक्रवारपासून बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे. महामार्ग पूर्ण करा, मगच टोल घ्या, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. ३१ मे रोजी हे आंदोलन अधिक तीव्र होणार असून कोकणवासीय महामार्ग दणाणून सोडणार आहेत. तसेच आंदोलनकर्ते टोल अधिकारी आणि एनएचएआय अधिकाऱ्यांना याचा जाब विचारणार आहे.

मे महिना संपत आला तरी महामार्गाचे काम अपूर्णच आहे. या पंधरा वर्षांच्या काळात कोकणवासीयांना रस्त्याचा रखडपट्टीमुळे अतोनात हाल सहन करावे लागत आहेत. महामार्गाच्या दुरवस्थेमुळे अपघातही मोठ्या प्रमाणात झाले आहेत. महामार्गाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. ३१ मेपर्यंत उर्वरित कामे पूर्ण होतील अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली असली तरी कामे मार्गी लागण्याची चिन्हे दिसत नाहीत. महामार्गाचे काम अपूर्ण असताना टोल वसुली सुरू झाल्याने आणि ९५ रुपयांचा टोल आकारला जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.

  • पळस्पे ते इंदापूर दरम्यानच्या पहिल्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे, मात्र नागोठणे, कोलाड येथील पुलांची कामे अजूनही अपूर्णावस्थेत आहे.
  • वडखळ येथील सर्व्हिस रोडची कामेही अद्याप पूर्ण झालेली नाहीत. इंदापूर आणि माणगाव येथील बाह्यवळण रस्त्यांची कामे रखडलेली आहे. चिपळूण, संगमेश्वर येथील पुलांची कामे अपूर्ण आहेत.

शिवसेनेचा पाठिंबा

टोलधाडीविरोधात मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम यांनी उपोषणस्थळी जाऊन आंदोलनकर्ते कार्याध्यक्ष सुरेंद्र पवार यांची भेट घेतली. तसेच त्यांना पाठिंबा जाहीर केला.