31 मे रोजी मुंबई-गोवा महामार्ग अपूर्णच! गडकरींनी दिले होते आश्वासन पण ठेकेदारांची कासवगाडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-गोवा महामार्ग ३१ मे ला पूर्ण होईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एप्रिल महिन्यात सिंधुदुर्गातील एका कार्यक्रमात दिले होते. त्यानंतर अधिकारी आणि ठेकेदारही ३१ मे पूर्वी काम पूर्ण करण्याची हवा निर्माण केली. प्रत्यक्षात आता रविवारी ३१ मे आहे आणि हा महामार्ग अपूर्णच आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग किती पूर्ण झाला याचे उत्तर मंत्री,अधिकारी किंवा ठेकेदार देणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सिंधुदुर्गमध्ये एप्रिल महिन्यात झालेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्ग ३१ मे रोजी पूर्ण होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर अनेकांनी मुंबई-गोवा महामार्गाचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांनीही आम्ही ३१ मे पूर्वी काम पूर्ण करू अशा घोषणा केल्या. मात्र ठेकेदारांनी आपले कासवगतीचे काम कायम ठेवत सर्वांनाच तोंडघशी पाडले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण पूल, संगमेश्वर पूल, निवळी पूल, पाली पूल आणि लांजा येथील पूलाचे काम अर्धवट आहे. संगमेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्याचे काम रखडले आहे. लांजा तालुक्यात वेरळ येथे काम रखडले आहे. त्यामुळे ३१ मे ची डेडलाईनही आता चुकली असून यंदाच्या गणेशोत्सवातही चाकरमान्यांच्या वाट्याला खडतर प्रवास येणार आहे. संगमेश्वर बसस्थानकासमोरील पुलाच्या संथ कामामुळे दररोज वाहतूक कोंडी होत आहे. पावसाळ्यात महामार्गावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होऊन वाहनचालकांची डोकेदुखी वाढणार आहे.