मुंबई-गोवा महामार्गावर दुभाजकांतील सिमेंट काँक्रीट धोकादायक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-gao-highway

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणांतर्गत महामार्गावरील दुभाजकांमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनी प्रशासनाने विविध प्रकारच्या शोभिवंत झाडांची लागवड केली आहे. मात्र ब्रिज व बॉक्सवेलवरील दुभाजकांमध्ये लागवड करण्यात आलेल्या झांडाच्या बुंध्यांपर्यंत चक्क सिमेंट-काँक्रीट घालण्यात आले आहे. या झाडांच्या बुंध्याजवळ अगदी कमी जागा सोडण्यात आली आहे. दुभाजकांमध्ये गवत वाढू नये या दृष्टीने ठेकेदार प्रशासनाने ही आयडिया लढवली आहे. मात्र ती लागवड करण्यात आलेल्या झाडांसाठी भविष्यात धोक्याची ठरू शकते. त्याचबरोबर काही बॉक्सवेलवरील संरक्षक भिंतीजवळ दुभाजकांमध्ये सिमेंट-काँक्रीटीकरण करण्यात आले आहे तेथे आता झाडे कशी लावणार हासुद्धा प्रश्नच आहे.

या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या चौपदरीकरणांतर्गत रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेकडो झाडांची तोड करण्यात आली आहे. या झाडांना पर्यायी लागवड म्हणून महामार्गालगत वृक्ष लागवड केली जाणार आहे. ही वृक्ष लागवड प्रतीक्षेत आहे. तोपर्यंत महामार्गाच्या दोन लेनमधील दुभाजकांमध्ये विविध प्रकारच्या शोभिवंत झाडांची लागवड करण्यात आली आहे. ठेकेदार प्रशासनाने हि लागवड केली असून या झाडांना उन्हाळ्यात पाणी घालत जगविण्यात आली. पावसाळ्यात ही झाडे ठिकठिकाणी रंगीबेरंगी फुलांनी बहरल्याने कुडाळ तालुक्यात ठिकठिकाणी या फुलांचा साज महामार्गावरून प्रवास करताना दिसत असे. त्यानंतर वादळी वारे व अतिवृष्टीमुळे ही झाडे उन्मळू नयेत यासाठी ठेकेदार प्रशासनाने पावसाळ्यात या झाडांना काठीचा आधार दिला आहे. त्यामुळे या झाडांची चांगल्याप्रकारे वाढ होत आहे.

दरम्यान, महामार्गावरील ब्रिज व बॉक्सवेलवरील दोन लेनच्या मधील दुभाजकांमध्ये अंतर कमी आहे. या दुभाजकांमध्ये माती टाकून तेथेही शोभिवंत झाडांची लागवड करण्यात आली आहे. मात्र या ठिकाणच्या दुभाजकांमध्ये झाडांच्या बुंध्यापर्यंत सिमेंट-काँक्रीट घालण्यात आले आहे. या दुभाजकांमध्ये गवत वाढू नये या दृष्टीने ठेकेदार प्रशासनाने ही अनोखी शक्कल लढविली खरी पण याचा धोका भविष्यात या झाडांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेताळबांबर्डे तिठा येथील बॉक्सवेलवरील संरक्षक भिंतीजवळच अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर एखादे झाड मृत झाल्यास परत तेथे लागवड होणे गरजेचे आहे. मग दुभाजकांमध्ये सिमेंट-काँक्रीटीकरण केल्यानंतर तेथे परत झाडे लावायची झाल्यास ती कशी लावायची? असे अनेक प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केले जात आहेत. उन्हाळ्यात झाडांना पाणी देतानाही या ठिकाणी अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. परिणामी दुभाजकांमध्ये घालण्यात आलेले सिमेंट-काँक्रीटीकरण भविष्यात लागवड केलेल्या झाडांना धोक्याचे ठरणार आहे.