
सामना ऑनलाईन । मुंबई
येत्या ५ सप्टेंबरपर्यंत मुंबई-गोवा महामार्गवरील खड्डे बुजवणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राज्य सरकारने आज उच्च न्यायालयात दिली. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे होणारे अपघात, प्रवाशांचे होणारे हाल याविरोधात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी ही माहिती देण्यात आली.
मुंबई-गोवा महामार्ग क्र.६६ वर दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून पनवेल ते दोडामार्गपर्यंत या महामार्गाची वाताहत झाली आहे. यासंदर्भात अॅड. ओवीस पेचकर यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर आधी घेण्यात आलेल्या सुनावणी वेळी राज्य सरकाने महामार्गावरील हे खड्डे बुजविण्यासाठी गणेश चतुर्थीपर्यंतचा अवधी लागेल, अशी माहिती राज्य सरकारने दिली होती. त्यावर न्यायालयाने खड्डे बुजविण्यासाठी गणेश चतुर्थीची वाट का पाहता असा खरमरीत सवालही सरकारला केला होता.



























































