खेड – मुंबई गोवा महामार्गावरील उड्डाण पुलाचे काम रखडले; भरणे जंक्शन येथे वाहतुकीची कोंडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बई गोवा महामार्गावरील भरणे नाका जंक्शन येथे उभारण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाचे काम रखडले असल्याने भरणे नाका येथे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होवू लागली आहे. सप्टेंबर अखेर पर्यंत उडाण पुलाच्या दोन मार्गिका सुरू होतील असे आश्वासन महामार्ग पेण विभागाचे अधिकारी श्रीकांत बांगर यांनी दिले आहे. मात्र ज्या गतीने काम सुरू आहे ते पाहता हे काम सप्टेंबर अखेर पूर्ण होईल असे वाटत नाही.

मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका हा परिसर गेल्या काही वर्षात व्यावसायिकदृष्ट्या विकसित झालेला परिसर आहे. या ठिकाणी शाळा, महाविद्यालये, बँका, हॉटेल्स, किराणा मालाची दुकाने, आठवडा बाजार भरत असल्याने इथे सतत वाहने आणि ग्राहकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मुंबई गोवा महामार्गावरून धावणारी बहुतांशी वाहने या ठिकाणी चहापान किंवा इंधन भरण्यासाठी थांबत असल्याने हा परिसर कायम गबजलेला असतो.

महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यावर या गजबजलेल्या जंक्शनचे काम युद्धपातळीवर पूर्ण करणे गरजेचे होते. मात्र चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने या कामाकडे लक्षच दिले नाही. चौपदरीकरण काम सुरू झाल्यावर ठेकेदाराने या ठिकाणी भला मोठा खड्डा खणायला सुरवात केली आणि वाहतुकीची पुरती वाट लावली. सुरवातीचे काही महिने या ठिकाणी केवळ खड्डा खणण्याचे काम सुरू होते. चौकशीदरम्यान या जंक्शनवर भुयारीमार्ग तयार केला जात असल्याचे ठेकेदार कंपनी सांगत होती.

काही महिने खोदाईचे काम केल्यानंतर भुयारी मार्ग रद्द करून या ठिकाणी उडाण पुल बांधण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले. ठेकदाराने खोदाईचे काम बंद करून खोदलेला खड्डा माती टाकून भरण्यास सुरवात केली. वाहतकीची कोंडी मात्र कायम होती.

नव्या निर्णयानुसार उड्डाण पुलाचे काम सुरु करून आता दोन वर्ष पुर्ण झाली मात्र पुलाचे काम अद्याप 50 टक्केही पुर्ण झालेले नाही. सद्यस्थितीत ज्या गतीने काम सुरु आहे हे पाहता पुढील दोन वर्षे काम पूर्ण होईल असेही वाटत नाही त्यामुळे भरणे जंक्शन येथे नेहमीच वाहतुक कोंडी झालेली पहावयास मिळते आहे.

उड्डाण पुलाचे काम सुरु केल्यावर महामार्गावरील रहदारीला अडथळा होणार नाही याची खबरदारी घेत ठेकेदार कंपनीने पर्यायी मार्गाची व्यवस्था करायला हवी होती. महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदार कंपनीकडून तसे पर्यायी मार्ग तयार करून घ्यायला हवे होते. मात्र पैसे वाचविण्याच्या नादात ठेकेदार कंपनीने तयार केलेली निकृष्ठ दर्जाचे पर्यायी मार्ग पहिल्याच पावसात खड्ड्यात गेले आणि भरणे नाका जंक्शनवर नेहमीच वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागलेल्या पहावयास मिळू लागल्या. आठ दिवसापुर्वी एका राजकिय पक्षाच्या कार्यकत्यांनी पर्यायी मार्गावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपन करण्याचे आंदोलन छेडले आणि त्यानंतर ठेकेदार कंपनीने धावपळ करून भर पावसातच पय यो मार्गाच्या डांबरीकरणाला सुरवात केली.

सद्य परिस्थितीत उड्डाण पुलाचे काम सुरु असले तरी कामाला गती नाही त्यामुळे पुलाचे काम वर्षभरात पुर्ण होईल असे वाटत नाही. महामार्ग विभागाचेअधिकारी श्रीकांत बांगर मात्र भरणे उडाण पुलाच्या दोन मार्गिका सप्टेंबर अखेर सुरु केल्या जातील असे सांगून वेळ मारून नेत आहेत. मात्र बांगर यांचा हा प्रयत्न म्हणजे ठेकेदार कंपनीला पाठीशी घालण्याचा प्रकार आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.