
राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांमधून मंजूर रस्ते व पुलांच्या ज्या कामांना अजून कार्यारंभ आदेश मिळालेले नाहीत अशी कामे 31 मार्च 2020 पर्यंत संस्थगित करावीत असे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला नुकतेच देण्यात आले आहेत. त्याचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील कोट्यवधीच्या कामांना बसणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते व पुलांची कामे, परिरक्षण व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येतात. ही कामे विविध कार्यक्रम किंवा योजनांमधून पूर्ण करण्याचे विभागाकडून निश्चित केले आहे. मंजूर करण्यात आलेली कामे आणि प्राप्त होणारा निधी यामध्ये तफावत आहे. राज्य योजनांतर्गत, नाबार्ड, केंद्रीय मार्ग निधी, अॅन्युईटी धर्तीवर, आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत व केंद्र शासन अर्थसहाय्यित या विविध स्त्रोतामधून निधी प्राप्त होतो. या स्त्रोतातून 2019-20 पूर्वी हाती घेतलेली कामे आणि 2019-20 या वर्षात नव्याने घेतलेल्या कामांकरिता निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
विभागांतर्गत राबविण्यात येणार्या रस्ते व पुल विकास कार्यक्रमांसंबंधी वस्तुस्थिती विचारात घेतल्यास हाती घेण्यात आलेल्या कामांची संख्या आणि निधी उपलब्धेचे प्रमाण यात प्रचंड विषमता आहे. 19-20 मधील उपलब्ध निधीवर कमी ताण व्हावा, तसेच सुरु असलेल्या कामांपैकी काही कामांचे उद्दीष्ट पूर्ण होण्यासाठी विभागाला उपलब्ध झालेला निधी आणि भविष्यात उपलब्ध होणारा निधी विचारात घेऊन विविध योजनांतर्गत जी कामे प्रत्यक्षात चालू झालेली आहेत, ती सोडुन नव्याने हाती घेतलेली अथवा अर्थसंकल्पीय पुस्तकात दर्शविलेल्या कामांपैकी ज्या कामांचे कार्यारंभ आदेश अद्यापपर्यंत देण्यात आलेले नाहीत, अशा सर्व कामांचे कार्यारंभ आदेश देण्याची कार्यवाही 31 मार्च 2020 पर्यंत संस्थगित करण्यात यावी अशा शासनाकडून एका परिपत्रकाद्वारे काढण्यात आले आहे.
हे परिपत्रक रस्ते विभागाचे सचिव चंद्रशेखर जोशी यांच्या सहीने राज्यातील सर्व विभागाच्या सार्वजनिक बांधकामच्या मुख्य अभियंतांना 14 नोव्हेंबरला पाठविण्यात आले असून , याची अंमलबजावणी तत्काळ करण्याचे आदेश याद्वारे दिले आहेत. या पत्रामुळे जिल्ह्यातील कोट्यवधी रुपयांची रस्त्यांची कामे थांबणार आहेत. यामध्ये गणपतीपुळे विकास आराखड्यातील रस्त्यांची कामांवरही परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. या सुचना आशियाई बँक सहाय्यित व हायब्रीड अॅन्युईटी योजनेंतर्गत कामांना लागू होणार नसल्याचे त्यात नमूद केले आहे.





























































