
मुंबई गोवा महामार्गाचे काम करताना नातुनगर कसबा येथे खोदाईसाठी करण्यात आलेल्या भुसुरुंगाच्या स्फोटामुळे सैल झालेली दरडीची माती पावसाचा जोर वाढताच कोसळू लागली असल्याने महामार्गापासून केवळ 6 मीटर अंतरावर असलेल्या एका घराला धोका निर्माण झाला आहे. हा धोका लक्षात येताच प्रशासनाने घरमालक देवेंद्र जाधव यांना सुरक्षित स्थळी स्थलांतर होण्याची नोटीस बजावली आहे. परंतू भरपावसात कुठेही स्थलांतर होणे शक्य नसल्याने या घरातील माणसं डोक्यावर मृत्युची टांगती तलवार घेऊनच वावरत आहेत.
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने काही ठिकाणी संभाव्य धोक्याचा विचार करून उपाययोजना करणे आवश्यक होते. मात्र ठेकेदार कंपनीने अशा प्रकारच्या कोणत्याही उपाययोजना न केल्याने पावसाळ्यात ठिकठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.
महामार्गावरील कसबे नातू पसिरात काम सुरु असताना दगड फोडण्यासाठी भुसुरुंगाचा सर्रास वापर करण्यात आला. हे करत असताना केवळ सहा मीटरवर असलेल्या घराला धोका पोहचेल, पावसाळ्यात या घरातील माणसांना घरात राहणे जीवावर बेतू शकते याचा ठेकेदार कंपनीने विचारच केलेला नाही. खोदाईचे काम सुरु झाल्यावर जाधव यांच्या घराच्या भिंतीला तडे गेले. तेव्हाच जाधव याना संभाव्य धोक्याची चाहूल लागली. आताच जर भितींला तडे जात असतील तर पावसाळ्यात हा धोका आणखी वाढेल हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ महामार्ग खात्याचे अधिकारी, जिल्हाधिकारी प्रांताधिकारी, यांच्याशी संपर्क साधून संभाव्य धोक्याची कल्पना दिली. २०१८ पासून जाधव संबंधित अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करत आहेत मात्र आजतागायत त्यांना सबंधित खात्याकडून किंवा प्रशासनाकडून दिलासादायक उत्तर मिळालेले नाही.
गेले चार दिवस कोकणात मुसळधार पाऊस सुरु आहेत. या दरम्यान भूसुरुंगामुळे सैल झालेली दरडीची माती रस्त्यावर आली आणि जाधव यांच्या घराचा धोका आणखीनच वाढला. त्यांच्या घराच्या अंगणापर्यंत मोठमोठ्या भेगा पडल्या आणि जाधव व त्यांच्या कुटुंबियाची पुरती झोपच उडाली. ही दरड जसजशी कोसळत जाईल तसतसा घर कोसळण्याचा धोका वाढत जाणार असल्याने यातून मार्ग कसा काढायचा हा प्रश्न जाधव याना पडला आहे.
या संभाव्य धोक्यातून कसे वाचायचे हा विचार करत असतानाच तालुका प्रशासनाने जाधव यांचे घर धोकादायक ठरवून सुरक्षितस्थळी स्थलांतरीत होण्याची नोटीस बजावली त्यामुळे जाधव व कुटंबियाच्या चिंतेत आणखीनच वाढ झाली आहे. वृद्ध आई-वडिलांना घेऊन या भर पावसात कुठे शिफ्ट व्हायचे हा प्रश्न आता जाधव यांना सतावू लागला आहे.
जाधव यानी पै-पै जमा करून स्वत:चे टुमदार घर उभे केले आहे. घर उभे करताना काय काय कष्ट करावे लागले हे केवळ त्यांनाचा माहित आहे. आज महामार्ग ठेकेदाराच्या चुकीमुळे या घराला धोका निर्माण झाला आहे. मात्र याकडे संबधित अधिकारी, प्रशासन किंवा तो ठेकेदार लक्ष द्यायला तयार नाही. प्रशासन आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष म्हणजे आमच्या दृष्टीने मृत्याला आमंत्रणच असल्याने येत्या १५ ऑगस्ट रोजी वृद्ध आई-वडिलांना घेऊन प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय जाधव यांनी घेतला आहे.





























































