
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या लढय़ास ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गणेश देवी यांनी पाठिंबा दिला आहे. मराठी भाषेला मारक असणाऱ्या प्रत्येक प्रवृत्तीशी लढा देणे आवश्यक असून ग्रंथसंग्रहालय वाचवले तरच मराठी भाषा वाचू शकते, असे ते म्हणाले. डॉ गणेश देवी यांच्यासोबत धनंजय शिंदे, अनिल गलगली, सुधीर हेगिष्टे, नायगाव शाखेचे कार्यवाहक कृष्णा नाईक, ऍड. योगेश गायकवाड, सुरेंद्र करंबे, नितीन मोहिते उपस्थित होते. डॉ गणेश देवी यांनी पुढे सांगितले,‘सर्वप्रथम ट्रस्टच्या माध्यमातून अनियमितता आणि सावळागोंधळ दूर करणे आवश्यक आहे. ट्रस्टने नकार दिल्यास कायदेशीर लढाई लढावी लागेल. सांस्कृतिक संस्थेच्या कामकाजाचे परीक्षण होणे गरजेचे आहे. यासाठी नेमलेल्या पाच सदस्यीय समितीने 21 दिवसांत अहवाल न दिल्यास त्यावर आंदोलनाची दिशा ठरवता येईल.



























































