मुंबईची आरोग्य यंत्रणा अधिक बळकट होणार, आरोग्यासाठी 6,933.75 कोटींची तरतूद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना काळातही मुंबई महापालिका सर्वसामान्यांना आरोग्य सेवा तत्परतेने पुरवत असून आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी भांडुप येथे एक सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारले जाणार असून कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात सुपर स्पेशालिटी विभाग सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सिद्धार्थ महाविद्यालय, शीव रुग्णालय आणि क्रांतिवीर महात्मा जोतिबा फुले रुग्णालय तसेच प्रसूतिगृहांचा पुनर्विकास केला जाणार असून त्यामुळे मोठय़ा प्रमाणात रुग्णांसाठी बेड उपलब्ध होणार आहेत. मुंबईकरांच्या आरोग्यासाठी 2022-2023 या अर्थसंकल्पात मुंबई महापालिकेने तब्बल 6 हजार 933.75 कोटींची तरतूद केली आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने राबवलेल्या धारावी आणि मुंबई मॉडेलची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली असून हे मुंबई मॉडेल राबवण्यासाठी अनेक देशांनी मुंबई महापालिकेचे मार्गदर्शन घेतले आहे. कोरोना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह चाचणी आणि लस उपलब्ध झाल्यानंतर विक्रमी लसीकरण करून देशपातळीवर नाव कमावले. महापालिकेने अत्यंत कमी वेळात यासाठी आरोग्य सुविधा उभारल्या. महापालिकेची तीन प्रमुख रुग्णालये आणि 16 सर्वसाधारण रुग्णालये दररोज लाखो रुग्णांना सेवा देत असतात. मात्र कोरोना आणि वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यावर भर दिला असून त्यासाठी रुग्णालयांचा पुनर्विकास केला जाणार आहे.

वैशिष्टय़े

n वैद्यकीय पदवीधरांसाठी प्रगत वैद्यकीय कौशल्यासाठी पोस्ट डॉक्टरल फेलोशिप्स अभ्यासक्रम राबवला जाणार आहे. n वैद्यकीय महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमाच्या जागा 550 वरून 800, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा 545 वरून 683 तर अतिविशेषकृत विभागाच्या जागा 97 वरून 114 इतक्या वाढवल्या आहेत.
n पालिकेच्या 201 स्मशानभूमींचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण. n डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसीसला आळा घालण्यासाठी ड्रोनचा वापर.

इथे होणार पुनर्विकास

बोरिवली, गोरेगाव, प्रभादेवी, देवनारमधील प्रसूतिगृहे तर डहाणूकरवाडी, चंदनवाडी, मुलुंड दवाखान्यांचे पुनर्विकासाचे काम पूर्ण झाले आहे. भगवती रुग्णालय, एम. टी. अगरवाल, मदनमोहन मालवीय रुग्णालय, वांद्रे भाभा, दादरमधील जाखादेवी मल्टिस्पेशालिटी क्लिनिक, नायर दंत विभागाची नवीन इमारत, शीव रुग्णालयातील नार्ंसग कॉलेज, कर्मचारी निवासस्थान, ऍकवर्थ रुग्णालयाच्या आवारात नवीन इमारत, शीव आणि कूपर रुग्णालयामधील काम प्रगतिपथावर आहे.

कर्करोग रुग्णांसाठी प्रोटॉन थेरपी

मुंबईत कर्करोग रुग्णांसाठी माफक दरात अद्ययावत उपचार मिळावेत यासाठी टाटा कर्करोग रुग्णालयाच्या मदतीने मुंबई महापालिका प्रोटॉन थेरपी सुविधा सुरू करणार आहे. कर्करोग रुग्णांना केमोथेरपीमुळे मोठय़ा प्रमाणात दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. त्यामुळे दुष्परिणाम कमी करणारी प्रोटॉन थेरपी मुंबई महापालिका सुरू करणार आहे. दरम्यान, नायर रुग्णालयातही ओन्कोलॉजी विभागाची इमारत, लायनर ऍक्सिलेटर आणि पीईटी स्कॅन इमारत उभारली जाणार आहे.