
iदोन आठवडय़ांच्या ब्रेकनंतर आजपासून मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. मुंबईसह ठाणे आणि पालघर या जिह्यांमध्ये 15 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे या जिह्यांमध्ये ‘ऑरेंज अॅलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासन व संबंधित यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून नैऋत्य मोसमी वारेही सक्रिय आहेत. त्यामुळे मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अनुमान आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघरमध्ये आज सकाळपासून पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्या. आज सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंतच्या 12 तासांत मुंबई शहरात 38.34 मि.मी., पूर्व उपनगरात 43.32 मि.मी. तर पश्चिम उपनगरात 32.36 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली.
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्येही आज मुसळधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. सिंधुदुर्ग जिह्यात 16 जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस
होईल असा इशारा हवामान खात्याने दिला असून जिह्यातील नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले आहे. सातारा, कोल्हापूरमध्येही 15 जुलैपर्यंत अतिवृष्टी होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
































































