पालिकेचे अपयश दाखवा; बेकायदा होर्डिंग्ज उतरवण्याचे निर्देश देऊ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील रस्त्यांच्या दुभाजकावर मधोमध उभारण्यात आलेल्या पॅंटिलिव्हर होर्डींगबाबत उच्च न्यायालयाने गुरुवारी कठोर भूमिका घेतली. होर्डींगसंबंधी मार्गदर्शक तत्वे तसेच धोरणाची अंमलबजावणी करण्यात जर पालिका अपयशी ठरली असेल, तर ते आम्हाला दाखवा. पादचारी आणि वाहतूक सुरक्षेचा प्रश्न विचारात घेऊन आम्ही मुंबईच्या रस्त्यांवरील सर्व बेकायदा पॅंटिलिव्हर होर्डींग उतरवण्यासंबंधी निर्देश देऊ, असे स्पष्ट करतानाच न्यायालयाने याचिकाकर्त्या मुंबई होर्डींग ओनर्स असोसिएशनला फैलावर घेतले.

न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. सुप्री अॅडव्हर्टायझिंग कंपनीने पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या दुभाजकावर उभारलेले पॅंटिलिव्हर होर्डींग बेकायदेशीर असून ते हटवण्याचे निर्देश द्या, अशी मागणी करीत मुंबई होर्डींग्ज ओनर्स असोसिएशनने रिट याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीवेळी खंडपीठाने पालिका तसेच याचिकाकर्त्या असोसिएशनवर प्रश्नांचा भडिमार केला. सुप्री अॅडव्हर्टायझिंग कंपनीने उभारलेले होर्डींग्ज 2007 च्या धोरणानुसार बेकायदेशीर असल्याचा दावा असोसिएशनने केला. मात्र कंपनीने आवश्यक सर्व परवानग्या घेऊन होर्डींग्ज उभारले आहेत. याचिकाकर्त्यांनी पॅंटिलिव्हर होर्डींग्जसंबंधी 2022 चे राज्य सरकारचे नवे धोरण याचिकेसोबत जोडले नसल्याचे अॅडव्हर्टायझिंग कंपनीतर्फे अॅड. व्यंकटेश धोंड यांनी न्यायालयाला सांगितले. त्याची दखल घेताना खंडपीठाने पालिकेला धोरण व मार्गदर्शक तत्त्वांबाबत विचारणा केली. त्यावर पालिकेने धोरणानुसार परवानगी दिल्याचे निदर्शनास येताच खंडपीठाने मुंबई होर्डींग्ज ओनर्स असोसिएशनला धारेवर धरले. तुम्ही याचिकेत जी मागणी केलीय, त्यालाच अनुसरून बोला. पालिकेला नवीन धोरण आखण्याबाबत आग्रह करु नका. पालिका धोरणांची अंमलबजावणी करण्यात कुठे अपयशी ठरली असेल तर ते आम्हाला दाखवा. मग आम्ही मुंबईच्या रस्त्यांवरील सर्व बेकायदा पॅंटिलिव्हर होर्डींग्ज उतरवण्याबाबत निर्देश देऊ, अशी भूमिका खंडपीठाने घेतली.

याचिका फेटाळण्याची मागणी

याचिकाकर्त्या असोसिएशनने कायद्याचा गैरवापर करुन याचिका दाखल केली आहे. त्यामुळे ही याचिका फेटाळून लावावी, असा युक्तिवाद अॅडव्हर्टायझिंग कंपनीतर्फे अॅड. व्यंकटेश धोंड यांनी केला. त्याची दखल घेत खंडपीठाने पुन्हा होर्डींग्ज ओनर्स असोसिएशनला झापले. तुम्ही विशिष्ट पद्धतीने धोरण आखण्याची मागणी करताय, मात्र ही मागणी मान्य करणार नाही. तुम्ही एका कंपनीला टार्गेट करताय, अशी टिप्पणी खंडपीठाने केली.

होर्डींग्जमुळे रस्ते अपघात झाल्याचे उदाहरण द्या!

रस्त्याच्या दुभाजकावर उभारलेले पॅंटिलिव्हर होर्डींग्ज वाहतुकीला अडसर ठरत आहेत, असा दावा करीत याचिकाकर्त्या असोसिएशनने होर्डींग्जसंबंधी 2007 चे धोरण तसेच होर्डींग्ज रोखण्याबाबत उच्च न्यायालयाच्या आधीच्या आदेशांकडे लक्ष वेधले. त्याची दखल खंडपीठाने घेतली. याचवेळी पश्चिम द्रुतगती महामार्गावर होर्डींग्जचा अडथळा ठरून ड्रायव्हरला पुढचे दिसेनासे झाल्याने अपघात घडल्याचे एखादे उदाहरण द्या, असेही न्यायालयाने होर्डींग्ज ओनर्स असोसिएशनला सुनावले.