दहा दिवसांत मॅनहोल सुरक्षित! न्यायालयाच्या दट्टय़ानंतर पालिका आयुक्त इन अॅक्शन

मुंबईतील धोकादायक मॅनहोलबाबत तातडीने कार्यवाही करून सर्व मॅनहोल मुंबई उच्च न्यायालयाने सक्त दखल घेत 20 ऑगस्टपर्यंत सुरक्षित करा आणि प्रमाणपत्र सादर करा, असे आदेश मुंबई महानगरपालिकेला दिले. उच्च न्यायालयाकडून विभागनिहाय नियुक्त तज्ञ वकील तसेच सहाय्यक आयुक्त दिनांक 21 ऑगस्टपासून संयुक्तपणे प्रत्यक्ष पाहणी करणार असून हा अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईतील सर्व 24 प्रशासकीय विभागांच्या हद्दीमध्ये, विभाग कार्यालय किंवा मध्यवर्ती यंत्रणा यांनी आपल्या अखत्यारीतील मॅनहोल झाकले असल्याची पुन्हा एकदा खातरजमा करावी आणि 20 ऑगस्ट 2023पर्यंत ही कार्यवाही करून त्याची पूर्तता केल्याबाबत दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत प्रमाणपत्र सादर करावे, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. दरम्यान, मॅनहोलविषयक कार्यवाहीचा पडताळणी अहवाल हा माननीय मुंबई उच्च न्यायालयात तीन आठवडय़ांच्या आत सादर करावयाचा आहे. त्याअनुषंगाने माननीय उच्च न्यायालयाकडून विभागनिहाय नियुक्त तज्ञ वकील तसेच संबंधित सहाय्यक आयुक्त हे दिनांक 21 ऑगस्ट 2023पासून संयुक्त पाहणी करतील आणि त्यांच्या संयुक्त स्वाक्षरीने माननीय न्यायालयाला अहवाल सादर करण्यात येणार आहे.

तीन आठवडय़ांत अहवाल सादर करणार

मॅनहोलविषयक कार्यवाहीचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात तीन आठवडय़ांच्या आत सादर करावयाचा आहे. तसेच या अनुषंगाने माननीय न्यायालयाकडून विभागनिहाय तज्ञ वकील नेमण्यात येणार आहेत. सदर तज्ञ वकील व संबंधित सहाय्यक आयुक्त यांच्याद्वारे आपापल्या हद्दीत दिनांक 21 ऑगस्ट 2023 पासून संयुक्त क्षेत्रीय पाहणी करण्यात येईल. तसेच त्या दोघांच्या संयुक्त स्वाक्षरीसह माननीय न्यायालयाला मॅनहोलबाबतचा अहवाल सादर होणार आहे.