पालिका शाळांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी मिळते का? हायकोर्टाचा प्रशासनाला सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला महापालिका तसेच सरकारकडून दिला जात आहे. तशी मोहीमही प्रशासनाने राबवली आहे. मात्र या मोहिमेवरूनच हायकोर्टाने पालिका तसेच सरकारला फटकारले. एवढेच नव्हे तर पालिका शाळांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी मिळते का, असा सवालही प्रशासनाला केला.

पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणाऱया अपुऱया सोयीसुविधांबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायमूर्तींनी शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांनी भरपूर पाणी प्यायले पाहिजे यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेबाबत चिंता व्यक्त केली. मुलांनी भरपूर शुद्ध पाणी प्यावे हा या मोहिमेचा उद्देश आहे. पण महापालिका शाळांत स्वच्छ पाणी पुरविले जाते का, असा सवाल खंडपीठाने केला. अनेक शाळांमध्ये नळाचे पाणी पुरविले जाते तर काही ठिकाणी तेही नसते, ही बाबही हायकोर्टाने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.