मुंबई उच्च न्यायालयाला पुन्हा धमकीचा मेल; पोलिसांकडून झाडाझडती, तपास यंत्रणा अलर्ट

मुंबई उच्च न्यायालयाला पुन्हा धमकीचा मेल आल्याने खळबळ उडाली आहे. उच्च न्यायालयात बॉम्बस्फोट होऊ शकतो असा दावा मेलवरून करण्यात आला. यामुळे तपास यंत्रणा अलर्ट झाली आणि पोलिसांनी उच्च न्यायालयात धाव घेत झाडाझडती सुरू केली. पोलीस, बॉम्ब शोधक पथकाने न्यायालय आणि परिसरात शोधमोहीम हाती घेतली. मात्र तपासणी दरम्यान संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्यामुळे ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे न्यायालयीन कामकाजाला सुरुवात झाली.

शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा ई-मेल प्राप्त झाला. त्यानंतर तात्काळ उच्च न्यायालय आणि परिसराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. खबरदारी म्हणून उच्च न्यायालयात प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

धमकीचा ई-मेल मिळताच परिसरात कसून चौकशी सुरू करण्यात आली. बॉम्ब शोधक पथकाच्या मदतीने न्यायालय आणि आसपासच्या परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. या शोधमोहिमेदरम्यान काहीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्यामुळे न्यायालयीन कामकाज वेळेवर सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे याआधीही मुंबई उच्च न्यायालयाला अशी धमकी मिळाली होती. त्यावेळीही संपूर्ण न्यायालय रिकामे करण्यात आले आहे. मात्र तपासणी दरम्यान कुठेही स्फोटके आढळली नाहीत. पोलीस सध्या धमकीचा ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध घेत आहेत.