
मागील सहा वर्षांतील निकालाच्या तुलनेत यंदा मुंबईचा भरघोस निकाला लागला आहे. मुंबई विभागातून परीक्षा दिलेल्या एकूण 3 लाख 31 हजार 136 विद्यार्थ्यांपैकी 3 लाख 20 हजार 284 विद्यार्थी पास झाले असून निकालाची टक्केवारी 96.72 एवढी आहे. इतर विभागाच्या तुलनेत मुंबई विभागातील 1 लाख 8 हजार 49 विद्यार्थ्यांना 75 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. विभागात सर्वाधिक निकाल मुंबई पूर्व उपनगरचा लागला आहे.
20 गुणांची तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता तर वाढलीच आहे, पण विभागवार निकालातही कमालीची वाढ झाली आहे. मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे. विभागातून परीक्षेला बसलेल्या 1 लाख 60 हजार 478 मुलींपैकी 1 लाख 56 हजार 838 मुली पास झाल्या आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 97.73 टक्के तर 1 लाख 70 हजार 658 मुलांपैकी 1 लाख 63 हजार 446 मुले पास झाली असून त्याचे प्रमाण 95.77 टक्के इतके आहे.
फूटपाथवर राहणाऱ्या आस्मा शेखने यश मिळविले
आझाद मैदान पोलीस स्थानकासमोरील फूटपाथवरच वडिलांसोबत राहणाऱ्या आस्मा शेखला 40 टक्के गुण मिळाले आहेत. डोंगरी येथील हिरजीभाई अल्लारखा या शाळेची ती विद्यार्थिनी आहे. अभ्यासाला अनुकूल वातावरण नसताना तिने हे यश मिळविले आहे. तिच्या या यशामुळे शाळेची पायरीही न चढलेल्या तिच्या वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
कॅन्सरवर मात; पृथ्वीराजला 98 टक्के
परळ येथील टाटा रुग्णालयात कॅन्सरवर उपचार घेणाऱ्या लातूरच्या श्री केशवराज विद्यालयाच्या पृथ्वीराज जाधव या विद्यार्थ्याला तब्बल 98 टक्के गुण मिळाले आहेत. शरीराच्या अनेक भागात कॅन्सरचा ट्यूमर असून टाटा रुग्णालयात उपचार घेता घेता त्याने मोठ्या जिद्दीने दहावीच्या परीक्षेची तयारी केली. नियमित पहाटे 4 वाजता उठून मी अभ्यास केला. माझ्या या यशात माझे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि टाटा रुग्णालयाच्या सामाजिक कार्यकर्ता अमिता भाटिया यांचा सिंहाचा वाटा आहे, असे पृथ्वीराजने सांगितले. पृथ्वीराज पुढे आणखी शिकायचे असून इंजिनीयरिंग क्षेत्रात करिअर करायचे आहे.
डोंबिवलीच्या निधी छेडाला 100 टक्के
डोंबिवली येथील निधी छेडा या विद्यार्थिनीला 100 टक्के गुण मिळाले आहेत. येथील सिस्टर निवेदिता इंग्लिश स्कूलची ती विद्यार्थिनी आहे. दहावीच्या लेखी परीक्षेत तिला एकूण 485 गुण मिळाले असून कला कोटयातून (कथ्थक) तिला 15 गुण असे मिळून 500 गुण मिळाले आहेत. इंग्रजी 91, मराठी 95, संस्कृत 99, गणित 96, विज्ञान 98, सामाजिक शास्त्रे 97 असे तिचे गुण आहेत.
मुंबईची मागील सहा वर्षातील टक्केवारी
वर्ष टक्केवारी
2015-92.90
2016- 91.90
2017 -90.09
2018- 90.41
2019- 77.04
2020 – 96.72
























































