
अडीचशेपेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या सहकारी हौसिंग सोसायटय़ांच्या निवडणुका आता मे महिन्याच्या सुट्टीत होणार आहेत. सहकार विभागाने लहान हौसिंग सोसायटय़ांच्या निवडणुका घेण्याचा अधिकार संबंधित संस्थांना दिला आहे. मात्र सदर निवडणुका घेण्यासाठी आवश्यक असलेली नियमावली अद्याप तयार झालेली नाही. त्या पार्श्वभूमीवर सहकार विभागाने संबंधित संस्थांच्या निवडणुका 30 एप्रिलअखेरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे राज्यातील हजारो हौसिंग सोसायटय़ांना नवीन कार्यकारिणी निवडीसाठी आणखी दोन महिने वाट पाहावी लागणार आहे.
सहकारी निवडणूक प्राधिकरणावरील कामाचा भार कमी करण्यासाठी अडीचशेपेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या सहकारी हौसिंग सोसायटय़ांच्या निवडणुका घेण्याचा अधिकार त्याच संस्थांना दिला आहे. त्यासाठी आवश्यक असलेली नियमावली तयार करण्यासाठी सहकार आयुक्तांनी समिती नेमली होती. त्यानुसार नियमांचे प्रारूप तयार करणे, त्यास विधी व न्याय विभागाची मंजुरी घेऊन लोकांकडून सूचना-हरकती मागवणे, नियम अंतिम करणे आवश्यक होते. मात्र आधी लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणुकीचे काम, त्यानंतर आता शेतकरी कर्जमुक्तीच्या कामात सहकार विभागाचे अधिकारी-कर्मचारी व्यस्त आहेत. त्यामुळे निवडणूक नियमावलीचे काम पुढील दोन महिने पूर्ण होऊ शकणार नसल्याने हौसिंग सोसायटय़ांच्या निवडणुका एप्रिल अखेरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत.




























































