हौसिंग सोसायट्यांच्या निवडणुकांना आता मार्चचा मुहूर्त

384

मुंबईसह महाराष्ट्रात सुमारे दीड लाखाहून अधिक हौसिंग सोसायटय़ा आहेत. त्यापैकी ज्यांची सभासदसंख्या 250 पेक्षा कमी आहे त्यांच्या निवडणुका घेण्याचा अधिकार संबंधित संस्थांना दिला आहे पण त्यांच्या निवडणुका घेण्याबाबतची नियमावली अद्याप निश्चित झालेली नाही. त्या पार्श्वभूमीवर सहकार विभागाने निवडणुकीला पात्र झालेल्या हौसिंग सोसायटय़ांच्या निवडणुका 29 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे हौसिंग सोसायटय़ांच्या निवडणुकांना मार्चचा मुहूर्त असल्याचे निश्चित झाले आहे.

सहकार कायद्यानुसार सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी 2014 मध्ये स्वतंत्र प्राधिकरणाची निर्मिती करण्यात आली, मात्र राज्यातील एकूण सहकारी संस्थांची संख्या अडीच लाखांच्या घरात असून त्यामध्ये सर्वाधिक हौसिंग सोसायटय़ा असल्याने प्राधिकणावर कामाचा ताण येत होता. त्याची दखल घेऊन ज्या हौसिंग सोसायटय़ांची सभासदसंख्या 250 पेक्षा कमी आहे त्यांच्या निवडणुका घेण्याचा अधिकार संस्थांनाच दिला आहे. त्यानुसार निवडणुकीबाबतचे नियम तयार करण्यासाठी सहकार आयुक्तांनी समितीची नियुक्ती केली होती, मात्र नियमावली वेळेत पूर्ण न झाल्याने सहकार विभागाने सप्टेंबरमध्ये आदेश काढून डिसेंबरअखेरपर्यंत निवडणुका पुढे ढकलल्या होत्या.

सभासद, पदाधिकाऱयांमध्ये नाराजी

हौसिंग सोसायटय़ांच्या निवडणुका घेण्याचा अधिकार संबंधित संस्थांना दिल्याने निवडणूक खर्चात मोठी बचत होईल असा विश्वास सभासद आणि पदाधिकारी व्यक्त करत होते, मात्र निवडणूक घेण्याचा अधिकार मिळाल्यानंतर आठ-नऊ महिन्यांनीही निवडणुकीला पात्र असलेल्या संस्थांच्या निवडणुका घेणे शक्य होत नाही. त्यामुळे सभासद, पदाधिकाऱयांमध्ये नाराजी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या